काकांवर टीका, मी भाजपचा - धनंजय मुंडे - Marathi News 24taas.com

काकांवर टीका, मी भाजपचा - धनंजय मुंडे


www.24taas.com ,परळी बीड
 
आपले  ज्यांच्याकडून कौतुक व्हायला हवे होते, त्यांच्याकडून ते कौतुक झाले नाही, असा अप्रत्य़क्ष टोला राष्ट्रवादीच्या मंचावरून गोपीनाथ मुंडेना यांना त्यांचे पुतण्याआमदार धनंजय मुंडे यांनी लगावला. आज माझ्या कार्यकर्त्यांचा जो सन्मान होत आहे, तो पाहण्यासाठी मी इथे आलो आहे,  मी अजून भाजप मध्ये आहे, असे स्पष्टीकरण धनंजय मुंडे यांनी दिले.
 
गोपीनाथ मुंडे यांचे थोरले बंधु  जिल्हा परिषद अध्यक्ष  पंडितअण्णा यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. यावेळी पंडितअण्णा यांचा अजित पवार यांनी सत्कार केला. परळी येथे झालेल्या या कार्यक्रमात अजित पवार यांच्यासह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड, आमदार जयदत्त क्षीरसागर आदी महत्त्वाचे नेते उपस्थित होते. या कार्यक्रमाला भाजपचे आमदार धनंजय मुंडे आणि ११ नगरसेवकही हजर होते. त्यामुळे यांच्याविरोधात भाजप काय कारवाई करेल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
 
मी बंड केलेले नाही. माझ्या कार्यकर्त्यांवर सातत्याने अन्याय केला गेला. त्यामुळे जनतेच्या विकासासाठी पालिका निवडणुकीत आम्हाला वेगळा विचार करावा लागला, असे धनंजय मुंडे यांनी काकांवर टीका करताना सांगितले. आज माझ्या  कार्यकर्त्यांचे जे कौतुक  होत आहे, ते पाहण्यासाठी मी इथे आलो आहे. माझ्या एका डोळ्यात आनंद अश्रू आहेत तर दुसऱ्या डोळ्यात अश्रू आहेत. जे मी केले आहे ते कोणाला शह देण्यासाठी केलेले नाही. माझी लढाई ही कार्यकर्त्यांच्या हितासाठी आहे, असे धनंजय मुंडे यांनी सांगितले.
 
माझे बंड परळीतील चांडळ चौकडीविरुद्ध आहे. पंडीतअण्णांनीच गोपीनाथ मुंडे यांना मोठे केले आहे. विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घेणार असून, मला विकासाचे राजकारण करायचे आहे. पक्षातून निलंबित केल्यास पुढील निर्णय नंतर घेऊ, असा इशारा यावेळी धनंजय मुंडे यांनी दिला.
 

 

First Published: Thursday, January 19, 2012, 16:11


comments powered by Disqus