Last Updated: Thursday, January 19, 2012, 16:34
www.24taas.com, परळी घर फोडलं, घर फोडलं. कोणी फोडलं घर? घर फोडायला काय, आम्ही दरोडेखोर आहोत, असा सवाल राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज गोपीनाथ मुंडेंना केला आहे. भाजप नेते आणि गोपीनाथ मुंडे यांचे ज्येष्ठ बंधू पंडितअण्णा मुंडें यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवारांच्या उपस्थितीत प्रवेश केला. त्यावेळी ते बोलत होते.
पंडितअण्णांना राष्ट्रवादीच्या गोटात ओठून अजित पवार यांनी गोपीनाथ मुडेंच्या बालेकिल्ल्यावर हल्ला चढवला आहे. अजित पवारांनी माझं घर फोडलं या गोपीनाथ मुडेंच्या वक्तव्याचा पवारांनी चांगलाच समाचार घेतला. दुसऱ्याचे घर फोडायला आम्ही दरोडेखोर नाहीत. आम्ही दिशाभूल करुन कोणालाही फोडलं नाही. पंडितअण्णा मुंडें सारख्या ज्येष्ठ नेत्याचे स्वागत करण्यासाठी आम्ही आलो आहे, घर फोडण्यासाठी नाही, असं पवारांनी ठणकावून सांगितलं. तुम्ही मुंबईला गेल्यावर भावाला विसरलात असा टोलाही पवारांनी मुंडेंना लगावला.
बीड बँक अडचणीत आहे, शेतकऱ्यांनी जायचे कुठे ? बीडचे वाटोळं कोणी केलं असा खडा सवालच अजितदादा पवारांनी विचारला. आपला तो स्वाभिमान, दुसऱ्याचा विश्वासघात. तसंच भाजपमध्ये गोपीनाथ मंडे यांना कोणी मान सन्मान देत नाही, असं शरसंधान पवारांनी मुंडे यांच्यावर केलं. पवारांनी कधीच जातीचे राजकारण केलं नाही. आजवर सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन राजकारण केलं, असंही पवार आपल्या भाषणात म्हणाले.
जनतेच्या विकासाला प्राधान्य क्रमा दिला. जनतेचा विश्वास संपादन केला त्यामुळे आमचा पक्ष सत्तेत राहिला आहे असंही पवारांनी सांगितलं.
दरम्यान, आपले ज्यांच्याकडून कौतुक व्हायला हवे होते, त्यांच्याकडून ते कौतुक झाले नाही, असा अप्रत्य़क्ष टोला राष्ट्रवादीच्या मंचावरून गोपीनाथ मुंडेना यांना त्यांचे पुतने आमदार धनंजय मुंडे यांनी लगावला. आज माझ्या कार्यकर्त्यांचा जो सन्मान होत आहे, तो पाहण्यासाठी मी इथे आलो आहे, मी अजून भाजप मध्ये आहे, असे स्पष्टीकरण धनंजय मुंडे यांनी दिले.
गोपीनाथ मुंडे यांचे थोरले बंधु पंडितअण्णा यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. यावेळी पंडितअण्णा यांचा अजित पवार यांनी सत्कार केला. मी बंड केलेले नाही. माझ्या कार्यकर्त्यांवर सातत्याने अन्याय केला गेला. त्यामुळे जनतेच्या विकासासाठी पालिका निवडणुकीत आम्हाला वेगळा विचार करावा लागला, असे धनंजय मुंडे यांनी काकांवर टीका करताना सांगितले.
आज माझ्या कार्यकर्त्यांचे जे कौतुक होत आहे, ते पाहण्यासाठी मी इथे आलो आहे. माझ्या एका डोळ्यात आनंद अश्रू आहेत तर दुसऱ्या डोळ्यात अश्रू आहेत. जे मी केले आहे ते कोणाला शह देण्यासाठी केलेले नाही. माझी लढाई ही कार्यकर्त्यांच्या हितासाठी आहे.
First Published: Thursday, January 19, 2012, 16:34