Last Updated: Sunday, January 22, 2012, 08:35
विशाल करोळे, www.24taas.com, औरंगाबाद ऐतिहासिक औरंगाबाद शहरात सध्या सगळीकडे घाणीचं साम्राज्य निर्माण झालं आहे. त्यामुळे सामान्य माणसांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. येत्या तीन दिवसात कचऱ्याची विल्हेवाट न लावल्यास महापालिका कर्मचाऱ्यांना मिळणारा सहावा वेतन आयोग थांबवण्यात येईल असा अल्टिमेटम महापालिका आयुक्तांनी दिला आहे.
औरंगाबाद शहरात सध्या असं घाणीचं साम्राज्य निर्माण झालं आहे. महापालिकेनं शहरातला कचरा उचलण्याचं कंत्राट रॅमकी इंटरनॅशनल या कंपनीला दिलं होतं. मात्र कंगाल महापालिकेकडे बिलं देण्यासाठी पैसेच नसल्यानं रॅमकी कंपनीनं शहरातला कचरा उचलणंच बंद केलं आहे. त्यामुळे शहरात कचऱ्याचे ढिग साचले आहेत. महापालिकेनं शहरातला कचरा उचलण्याची व्यवस्था सुरू केली. मात्र तोकडी यंत्रणा असल्यानं शहरात घाणीचं साम्राज्य पसरलं आहे. त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे.
महापालिका आयुक्तांनी शहरातली कचरा समस्या गंभीर असल्याचं मान्य केलं आहे. तसंच येत्या तीन दिवसांत कचरा न हटवल्यास अधिकाऱ्यांना देण्यात येणारा सहावा वेतन आयोग थांबवण्यात येईल असा दमही आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.
औरंगाबाद पर्यटन केंद्र असल्यानं शहरात दररोज हजारो पर्यटक येतात. मात्र या पर्यटकाच्या स्वागतालाच कचरा उभा असल्याचं चित्र सध्या निर्माण झालं आहे. त्यामुळे शहरातल्या कचऱ्याची समस्या लवकरात लवकर सोडवावी, अशी सामान्य औरंगाबादकरांची मागणी आहे.
First Published: Sunday, January 22, 2012, 08:35