अलिगढच्या उपकेंद्राला सेनेचा विरोध - Marathi News 24taas.com

अलिगढच्या उपकेंद्राला सेनेचा विरोध

झी २४ तास वेब टीम, औरंगाबाद
 
औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील शुलिभंजन इथे उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या उपकेंद्राला शिवसेनेने तीव्र विरोध केला आहे.
 
शुलिभंजन हे दत्तात्र्याचे स्थान असून हिंदुचे पवित्र धर्मस्थळ आहे आणि या उपकेंद्राच्या उभारणीने जातीय तेढ निर्माण होईल अशी शिवसेनेची भूमिका आहे. शुलिभंजन औरंगाबाद शहरापासून फक्त १५ किलोमिटर अंतरावर आहे. अलिगढ मुस्लिम विद्यापीठाची देशभरात केंद्रे स्थापन करण्यात येत आहेत त्यापैकी एक खुलताबादला मिळाले आहे.
 
केंद्र सरकारने विद्यापीठाला देशात पाच केंद्रे सुरु करण्याची परवानगी दिली आहे त्यापैकी एक महाराष्ट्राच्या वाट्याला आलं आहे.  केंद्र सरकारने त्यासाठी २५ कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला आहे. तसेच सरकारने या उपकेंद्रासाठी २६० एकराच्या भखंडाची उपलब्ध करुन देण्याच्या प्रक्रियेला सुरवात केली आहे. खुलताबाद तालुका राज्य शासनाने शैक्षणिक झोन म्हणून जाहीर केला आहे.
 
अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचे एक शिष्टमंडळ पाहणीसाठी २६ डिसेंबरला खुलताबादला भेट देणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसेने विद्यापीठामुळे देश आणि परदेशातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची व्यवस्था उपलब्ध होणार असल्याने शिवसेनेने राजकारण करु नये अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

First Published: Tuesday, October 25, 2011, 11:54


comments powered by Disqus