हिंगोली पालिका निवडणूक जाहीर, आचारसंहिता सुरू - Marathi News 24taas.com

हिंगोली पालिका निवडणूक जाहीर, आचारसंहिता सुरू

झी २४ तास वेब टीम, हिंगोली
 
हिंगोली, कळमनुरी व वसमतनगर पालिकेच्या निवडणुका आज जाहीर करण्यात आला. त्यानुसार १६ ते २२ नोव्हेंबर दरम्यान इच्छुक उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहेत. आलेल्या अर्जांची २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता छाननी करण्यात येणार आहे. २९ नोव्हेंबरपर्यंत दाखल करण्यात आलेले अर्ज परत घेता येणार आहेत. ३0 नोव्हेंबर रोजी अंतिम उमेदवारांना निवडणूक विभागाच्या वतीने चिन्ह वाटप करण्यात येणार आहेत. १ डिसेंबर रोजी मतदान केंद्राची यादी जाहीर करण्यात येणार असून, ८ डिसेंबर रोजी तिन्ही शहरांमध्ये मतदान होणार आहे. ९ डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.
 
 
जिल्ह्यातील तिन्ही नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, यासंदर्भात आज निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याने शहरी भागात आचारसंहिता लागू झाली असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी दिली.
 
हिंगोली शहरात सर्वाधिक मतदार
निवडणूक विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीनुसार हिंगोली शहरात ६५ हजार २५७ मतदार आहेत. वसमत शहरात ४५ हजार ३३३ तर कळमनुरी शहरात १६ हजार ८७२ मतदार आहेत. हिंगोलीतून २८, वसमतमधून २६ तर कळमनुरीतून १७ नगरसेवकांची निवड मतदानाद्वारे करण्यात येणार आहे.
शहरासाठीच आचारसंहिता राहणार
 
नगराध्यक्ष पदासाठी शुक्रवारी पुन्हा सोडत
जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी व वसमतनगर पालिकेच्या अध्यक्षपदासाठी यापूर्वी आरक्षण सोडत काढण्यात आली होती; परंतु त्यानंतर महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५0 टक्के आरक्षण शासनाने जाहीर केल्याने पुन्हा ४ नोव्हेंबर रोजी मुंबई येथील मंत्रालयात स्वतंत्र आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.

First Published: Wednesday, November 2, 2011, 05:52


comments powered by Disqus