Last Updated: Tuesday, March 27, 2012, 16:35
www.24taas.com, बुलढाणा औरंगाबादपाठोपाठ बुलढाणा जिल्हातल्या चिखलीतून दोन संशयित अतिरेक्यांना काल रात्री ताब्यात घेण्यात आलंय. अकोला एटीएसनं ही कारवाई केलीय. अखिल मोहम्मद युसूफ खिलची आणि मोहम्मद जाफर या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे दोघे संशयित खांडव्याचे असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे.
औरंगाबादमध्ये काल अटक करण्यात आलेल्या अतिरेक्यांनी न्यायाधिशांच्या हत्येचा कट केल्याचं पोलीस तपासात पुढं आल्याचं सूत्रांनी सांगितलंय. अयोध्याप्रकरणी निकाल देणा-या अलाहाबाद हायकोर्टाच्या न्यायाधिशांना मारण्याचा या अतिरेक्यांचा कट होता, अशी सूत्रांनी माहिती दिली. अयोध्याप्रकरणी निकाल देणारे न्यायाधीश अहमदाबाद बॉम्बस्फोटातल्या संशयित अतिरेक्यांच्या निशाण्यावर असल्याचं पुढं आलं. अलाहाबाद हायकोर्टाचे हे न्यायाधीश असून डीव्ही शर्मा, सुधीर अग्रवाल आणि एस यू खान असं या न्यायाधीशांचं नाव आहे.
मध्यप्रदेशात गुन्हेगारी कारवाया करून औरंगाबाद, जालना आणि बुलढाण्यात तळ ठोकण्याचा या अतिरेक्यांचा इरादा होता. इंडियन मुजाहिदीनचे अतिरेकी असलेल्या या तिघांसोबत काल एटीएसची चकमक झाली. त्यात खलील खिलजी हा ठार झाला तर त्याचे साथीदार खलील उर्फ शाकिर हुसेन आणि अब्रार यांना अटक करण्यात आली. खांडवा पोलीस स्टेशन समोरच्या मनिपूरम गोल्ड बँकेवर भरदिवसा दरोडा टाकून याच दहशतवाद्यांनी बँक मॅनेजरचा खून करून १३ किलो सोने लुटल्याची माहितीही समोर आली. लुटलेली संपत्ती माल-ए-गनिमतच्या नावाखाली अतिरेक्यांच्या कुटुंबियांना पुरवली जाते. तर आश्चर्याची गोष्ट म्हणजे १९९९मध्ये औरंगाबादमध्ये झालेल्या इख्वान परिषदेत सफदर नागोरीसह अटक झालेला अब्रार आणि चकमकीत ठार झालेला खलील खिलजीही हजर होता, असंही समोर आले.
First Published: Tuesday, March 27, 2012, 16:35