हर्षवर्धन अखेर 'मनसेत'च राहाणार - Marathi News 24taas.com

हर्षवर्धन अखेर 'मनसेत'च राहाणार

www.24taas.com, औरंगाबाद
 
औरंगाबादमधील कन्नडचे मनसे आमदार हर्षवर्धन जाधव मनसेत राहणार की शिवसेनेत जाणार या वादावर सध्यातरी पडदा पडला आहे. आपण मनसेतच राहणार असल्याचं खुद्द हर्षवर्धन जाधव यांनी सांगितलंय.
 
जिल्हा परिषद सभापतीपदाच्या निवडणुकीनंतर हर्षवर्धन जाधव पुन्हा एकदा नाराज झाले होते. त्यांच्या कन्नड मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्य पुनम राजपूत यांना सभापतीपद देण्यात आल्यानं जाधव नाराज होते. पुनम राजपूत या हर्षवर्धन जाधव यांचे कट्टर राजकीय शत्रू उदयसिंग राजपूत यांच्या पत्नी आहेत त्यामुळेच जाधव नाराज होते.
 
मात्र राज ठाकरेंनीच हर्षवर्धन जाधव यांची समजूत काढत त्यांनी भेटीसाठी मुंबईत बोलावलं आहे. त्यामुळे सध्या तरी जाधव यांचं बंड शमवण्यात राज ठाकरेंना यश आलंय. आता आजच्या भेटीनंतर हर्षवर्धन जाधव पुढील वाटचाल ठरवणार आहेत.

First Published: Tuesday, April 3, 2012, 10:07


comments powered by Disqus