औरंगाबादसह मराठवाड्यात दुष्काळ - Marathi News 24taas.com

औरंगाबादसह मराठवाड्यात दुष्काळ

www.24taas.com, औरंगाबाद
 
 
औरंगाबादसह मराठवाड्यातली दुष्काळी परिस्थितीही दिवसोंदिवस बिकट होत चाललीये. पाणीपुरवठा करणा-या छोट्या-मोठ्या धरणांच्या आणि तलावांच्या पातळीत कमालीची घट सुरुय.. उन्हासोबतच गावोगावी हे पाणीटंचाईचे चटकेही जाणवू लागलेयेत.. मेचा संपूर्ण महिना कसा काढायचा, या प्रश्नानी सगळेच हैराण आहेत.
 
 
रणरणत्या उन्हात एका हंडा पाण्यासाठी चार चार तासांची प्रतीक्षा.. औरंगाबादपासून अवघ्या 50 किलोमीटरवर असलेल्या डोनवाडा गावातलं हे पाणीटंचाईचं भीषण वास्तव.. विहीर ही अशी तळाला गेलेली .. 4 ते 5 तासांनी विहीरीत थोंडं पाणी साचतं..आणि त्या पाण्यासाठी लागलेले हे हंड्यांचे नंबर.. 24 तास जागून 3 ते 4 कुटुंबांच्याच वाट्याला एक-एक हंडा पाणी येतंय.. गावातल्या इतर मंडळींपुढे दिवस-रात्र विहीरीच्या काठावर पाण्याची वाट पाहणं हा दिनक्रम झाला आहे.
 
 
 
एकट्या डोणगावची नाही, अंजनडोहचीही हीच परिस्थिती आहे.. गावात नदी आहे पण ती आटलीय.. दोन तलावही आहेत, मात्र तेही सुकलेत. हातपंपांना पाणी येत नाहीये.. पाणी असलेली एकच विहीर गावात शिल्लक आहे.. विहिरीतलं पाणी संपलं तर करायचं काय, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. डोनवाडा, अंजनडोहसारख्या शेकडो गावांत हीच परिस्थिती आहे.. अजूनही टँकर या गावांपर्यंत पोहचलेले नाहीत.. ज्या गावात टँकर पोहचलेत तिथं भांडणं नित्याची झालीयेत.. अधिका-यांना या गावांची दु:ख माहितीच नाहीयेत.. जिल्ह्यात सध्या 18 गावांमध्ये 20 टँकरनं पाणीपुरवठा असल्याचं सांगण्यात येतय. योग्य उपाययोजना करु असं सरकारी उत्तर देण्यात कुणीच मागे नाही.
 
 
मराठवाड्यातल्या मोठ्या धरणांपैकी जायकवाडी धरणात फक्त 17 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यातून औरंगाबाद शहरासह 250 विविध योजनांना पाणीपुरवठा करण्यात येतोय.. सध्याच्या पाणीवापरानुसार दर आठवड्याला 40 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा कमी होतोय.. म्हणजे आता केवळ 9 आठवडेच पुरेल इतकाच पाणीसाठा जायकवाडीत शिल्लक आहे. पाऊस कमी झाल्यानं संपूर्ण मराठवाड्यातच हीच परिस्थिती आहे..मे महिना कसा निभणार, असा मोठ्ठा प्रश्न सगळ्यांसमोरच आहे.
 

First Published: Thursday, April 19, 2012, 17:19


comments powered by Disqus