रूग्णालयात मारहाण, डॉक्टर अघोषित संपावर - Marathi News 24taas.com

रूग्णालयात मारहाण, डॉक्टर अघोषित संपावर

www.24taas.com, औरंगाबाद
 
औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात  डॉक्टरांच्या मार्ड संघटनेनं अघोषित संप पुकारला आहे. संपामुळं रुग्णसेवेवर परिणाम झाला आहे. रुग्णांचे हाल सुरु झाले आहेत. हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या रुग्णांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
 
यात काही महिला रुग्णही आहेत. यातल्या एका महिलेची तब्येत अधिकच खालावली आहे. असं असतानाही तिच्यावर उपचार करण्यासाठी कोणीही डॉक्टर संबधित विभागात नाही. दोन तासांपासून एक महिला हॉस्पिटलमध्ये वेदनांनी विव्हळत पडली होती. मात्र तिच्यावर उपचार करण्यासाठी एकही डॉक्टर विभागात आलेला नाही. एका डॉक्टरला रिक्षाचालकानं केलेल्या मारहाणीप्रकरणी हा संप पुकारण्यात आला आहे. शीला काकडे या महिलेला उपचारांसाठी  रिक्षाचालक कपिल भालेराव घाटी रुग्णालयात घेऊन आला होता.
 
पण त्यावेळी डॉक्टरांनी महिलेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत रिक्षाचालकानं डॉक्टर सतिश साळुंके यांना मारहाण करून तिथून पळ काढला. त्यानंतर सर्व डॉक्टर्सनी रिक्षाचालकाला शोधून मारहाण केली. या संपूर्ण घटनेनंतर घाटीच्या सर्व डॉक्टर्सनी अघोषित संप पुकारला आहे. इतर डॉक्टर्सनाही काम करायला मार्डच्या डॉक्टरांनी बंदी घातली आहे. कुठलीही पूर्वसुचना न देता मार्डचे डॉक्टर्स संपावर गेल्यामुळं मराठवाड्यातून घाटी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांचे हाल होत आहेत.
 
 
 

First Published: Monday, April 23, 2012, 15:39


comments powered by Disqus