Last Updated: Monday, May 7, 2012, 16:09
www.24taas.com, परभणी 
विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे. परभणी-हिंगोली आणि नाशिक विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरोधात काँग्रेसनं उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. परभणीत राष्ट्रवादीतर्फे बाबाजानी दुर्राणी यांनी अर्ज भरला आहे. राष्ट्रवादीसाठी जागा सुटलेली असताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश देशमुख यांनीही अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे.
तर दुसरीकडे नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या जयंत जाधव यांच्याविरोधात काँग्रेसचे राजेंद्र चव्हाणके यांनी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणज्ये चव्हाणके यांचा अर्ज दाखल करताना सिन्नरचे काँग्रेसचे उमेदवार माणिकराव कोकाटेही हजर होते. कोकाटे हे भुजबळांचे जिल्ह्यातले कट्टर विरोधक मानले जातात. भुजबळ काँग्रेच्या लोकांना संपवत असल्यामुळं अर्ज भरल्याचं कोकाटे यांनी सांगितलं आहे.
या दोन्हीही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटलेल्या आहेत. त्यामुळं आघाडीमध्ये बिघाडी होण्याची चिन्हे आहेत. यावर राष्ट्रवादी काय प्रत्युत्तर देतं याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे. तर मुख्यमंत्र्यांनी मात्र दुसरीकडं काँग्रेसमधल्या बंडखोरांची समजूत काढणार असल्याचं सांगितलं आहे. बंडखोरांना उमेदवारी मागे घ्यायला लावू असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
First Published: Monday, May 7, 2012, 16:09