खात्याची करामत, जिवंत पोलीस 'मयत' - Marathi News 24taas.com

खात्याची करामत, जिवंत पोलीस 'मयत'

महेश पोतदार, www.24taas.com, उस्मानाबाद
 
उस्मानाबाद जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या कार्यालयातील कारकुनांच्या करामतीमुळं जिवंत पोलिसालाच मयत दाखवण्याचा संतापजनक प्रकार घडलाय. स्वेच्छानिवृत्ती घेणा-या या पोलिसाला यामुळं मोठ्या मानसिक त्रासाला सामोरं जावं लागलंय.
 
पोलीस खात्यातून स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या रामेश्वर यादव यांना उस्मानाबाद जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या कार्यालयातील करामतीमुळं ते जिवंत असूनही कागदोपत्री मृत घोषित करण्यात आलं आहे. २५ वर्षं पोलीस दलाची सेवा केल्यानंतर मेंदूच्या एका आजारपणात उजव्या हाताची हालचाल मंदावल्यानं त्यांनी २०१०मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली. पेन्शन मिळण्यासाठीची आवश्यक कागदपत्रे पोलीस अधिक्षक कार्यालयातील आस्थापना विभागात दाखल केली. परंतु इथल्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या पेन्शनच्या प्रस्तावावर चक्क मयत म्हणून नोंद केल्यानं त्यांना दोन वर्षे पेन्शन मिळण्यास विलंब झालाय.
 
यादव यांची पत्नी आणि मुलांचे निधन झाले असून वृद्ध आई-वडिलांसोबत ते राहत आहेत. उशिरानं पेन्शन सुरु झाली असली तरी यादव यांची अनेक सरकारी बिले निघणं बाकी आहे. वरिष्ठांना अंधारात ठेवून अशा प्रकारे अडवणूक करणाऱ्या लिपिकांवर कारवाई  होणं गरजेचं आहे.

First Published: Tuesday, May 8, 2012, 21:00


comments powered by Disqus