उद्धव ठाकरेंनी सभा गाजवली, Uddhav Thackeray in Jalna

उद्धव ठाकरेंनी जिंकून दाखविले

उद्धव ठाकरेंनी जिंकून दाखविले
www.24taas.com,जालना

महाराष्ट्रातला दुष्काळाचा मुद्दा आगामी काळात राजकीय हत्यार बनणार, हे स्पष्ट झालंय. दुष्काळाची सर्वाधिक झळ पोहोचत असलेल्या मराठवाड्यात उद्धव ठाकरे यांनी आपली सभा गाजवली. दोन लाखांच्या आसपास गर्दी जमवून शिवसेनेनं आपली ताकद दाखवून दिलीये. दुष्काळाबाबत उद्धव यांनी सरकारवर तोफ डागली.

मराठवाड्याच्या दुष्काळाबाबत विधीमंडळाचं एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. जालन्यातल्या जाहीर सभेत बोलताना उद्धव यांनी केंद्र आणि राज्य सरकारांवर तीव्र शब्दांत टीका केलीये. उद्धव ठाकरेंचा दुष्काळी दौरा आजपासून सुरू झाला. सरकारनं मराठवाड्याला पाणी द्यावं, तसंच विजबिलं, शाळेची फी माफ केली जावी अशी मागणीही ठाकरे यांनी केली आहे.

कर्जमाफी म्हणजे भीक नाही. आज मराठवाड्यासाठी कुठलाही नेता मराठवाड्याच्या विकासासाठी राजीनामा देण्याचा इशारा करत नाही. तसंच आबा, बाबा, दादा असं म्हणवणारे मंत्री नुसतेच नावाचे आहेत. त्यांना जनतेचे देणे घेणं नाही, यापुढे तुम्हाला रस्त्यावरून फिरू देणार नाही, असा गंभीर इशारा यावेळी उद्धव यांनी दिला.

सिंचन घोटाळ्यात नाव असणाऱे अजित पवार काय मदत करणार? असा सवालही उद्धव यांनी केला. तसंच शरद पवार यांची ‘पाणी आडवा, जिरवा’ ही योजना म्हणजे ‘पैसा आडवा, पैसा जिरवा’ अशी आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. दुष्काळग्रस्तांसाठी असलेला पैसा दुष्काळग्रस्तांवरच खर्च होतोय का हे तपासून पाहायला हवं, असेर उद्धव म्हणालेत.

मराठवाड्यातील दुष्काळावर विधिमंडळाचं एक दिवसाचं अधिवेशन घ्यावं, अशी मागणी यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मराठवाड्यातील जनता दुष्काळाने खचली आहे. हेलिकॉप्टरमधून येताना हा एक वाळवंटी प्रदेश वाटत होता, इतका दुष्काळ या भागात आहे. महाराष्ट्राचं बे’सहारा’ वाळवंटच झाल्याचं यावेळी दिसून आल्याचे ते म्हणालेत.

केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केलेल्या हिंदू दहशतवादावर देखील उद्धव ठाकरेंनी यावेळी जोरदार टीका केली. तुमच्याकडे पुरावे असतील तर पुरावे द्या. आम्हाला जात, धर्म कळत नाही, आमच्यासाठी हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे, त्यामुळे जो कोणी देशाशी गद्दारी करेल त्याला फासावर लटकवला पाहिजे .पण काँग्रेस सरकार धर्माच्या नावावर राजकारण करत आहे, असा आरोप उद्धव यांनी यावेळी केला.

First Published: Sunday, February 3, 2013, 20:50


comments powered by Disqus