शिवसेना- मनसेमध्ये नेमकं काय शिजतंय? Will Shiv Sena- MNS join hands for Aurangabad?

शिवसेना- मनसेमध्ये नेमकं काय शिजतंय?

शिवसेना- मनसेमध्ये नेमकं काय शिजतंय?
www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबाद

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी 2 सप्टेंबरला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीकडं स्पष्ट बहुमत आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याची तयारी शिवसेनेनं सुरु केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद इतर मागासवर्गीय प्रवर्गातील महिलांसाठी राखीव आहे. त्यात कॉंग्रेसच्या नाहेदाबानो पठाण यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांचे पद आणि सदस्यत्व रद्द झाले आहे. आता काँग्रेसकडे शारदा जारवाल या एकमेव इतर मागासवर्गीय प्रवर्गातील सदस्य आहेत. त्यांच्याही जात प्रमाणपत्रांवरही आक्षेप घेण्यात आल्यानं काँग्रेसच्या अडचणी वाढल्यात.

60 सदस्य असणाऱ्या जिल्हा परिषदेत काँग्रेसचे 16, राष्ट्रवादीचे 10 मनसेचे 8 तर अपक्ष म्हणून निवडून आलेल्या आमदार प्रशांत बंब आघाडीच्या 2 सदस्यांच्या पाठिंब्यावर काँग्रेस आघाडीकडे 36 चे भक्कम संख्याबळ आहे.

एका सदस्याचे सदस्यत्व रद्द झाल्याने काँग्रेस आघाडीच्या संख्येत एकाने घट झाली तरी सत्तेसाठी 35 चे भक्कम संख्याबळ काँग्रेसकडे आहे. मनसेच्या 8 सदस्यांपैकी दोन सदस्य हे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या गटाचे आहेत. शिवसेनेचे 17 सदस्य तर भाजपचे 6 आणि मनसेचे 6 अशांची आघाडी झाली, तरीही हे संख्याबळ 29पर्यंतच जाते.

परिस्थिती विपरित असली तरीही शिवसेनेच्या नेत्यांनी स्थानिक मनसे नेत्यांच्या भेटी घेत अध्यक्षपद मनसेला देण्याचं आश्वासन दिल्याची विश्व सनीय माहिती आहे त्यामुळे चमत्कार घडेल असा दावा शिवसेनं केलाय. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काँग्रेस - राष्ट्रवादीशी अडीच वर्षांचा करार केलाय. त्यामुळे मनसे शिवसेनेसोबत जाणार की काँग्रेससोबत याचीच उत्सुकता आहे.

विधानपरिषदेचा पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागलाय. त्यामुळे आता आयती आलेली संधी सोडायची नाही असा निर्धार सेनेनं केलाय. मात्र संख्याबळ कसे जमणार आणि मतांची फाटाफूट कशी होणार यावरच अध्यक्षपद अवलंबून आहे. त्यामुळे आता या निवडणूकीतही मतदारांची पळवापळवी आणि घोडेबाजार होणार हे निश्चित..


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, August 26, 2013, 18:47


comments powered by Disqus