त्याची मजा दुसऱ्याच्या जीवावर बेतली, Yadav Rajababu unconscious after being bottled in Latur

त्याची मजा दुसऱ्याच्या जीवावर बेतली

त्याची मजा दुसऱ्याच्या जीवावर बेतली
www.24taas.com,लातूर

एखाद्याची मजा दुस-यासाठी सजा होऊ शकते याचा प्रत्यय आला लातूरमधल्या यादव कुटुंबीयाना. शहरातल्या बसस्थानकासमोरून बाईकवरून जात असताना जवळच्याच बारमधून फेकलेली बाटली राजेभाऊ यादव या शेतक-याच्या डोक्यावर बसली आणि ते कोमात गेले. गेला दीड महिना राजेभाऊंवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

४० वर्षीय राजेभाऊ यादव या शेतक-याची ही स्थिती कोणत्या मोठ्या अपघाताने नव्हे तर एक क्षुल्लक घटना याला कारणीभूत ठरलीये. राजेभाऊ यादव हे त्यांच्या पत्नीसह बाईकवरून बसस्थानकासमोरून जात होते. त्यावेळी जवळच्याच रसोई बारमधून एक बाटली त्यांच्या डोक्यावर आदळली आणि ते खाली कोसळले. कसेबसे ते आपल्या घरी पोहचले. मात्र, त्यानंतर ते जे कोमात गेले ते अद्याप शुद्धीवर आलेच नाहीत.

घरची आर्थिक स्थिती बेताचीच. त्यामुळे यादव कुटुंबीयांना व्याजाने कर्ज घेऊन राजेभाऊंच्या उपचाराचा खर्च भागवावा लागतोय. तर दुसरीकडे त्यांच्या या स्थितीला कारणीभूत ठरलेल्यांवर मात्र अजूनही ठोस काहीही कारवाई झालेली नाही. यादव कुटुंबीय सध्या अस्वस्थ आहे.

याप्रकरणी पोलिसांनीही काहीशी दिरंगाई करत अखेर बारच्या एका कर्मचा-याला अटक केलीय, मात्र त्यासाठी पोलिसांना लागला एक महिन्याचा काळ. या घटनेनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. तशी माहिती संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष सत्तार पटेल यांनी दिली. रसोई बारच्या चुकीचा फटका या शेतकरी गरीब कुटुंबाला बसलाय. त्यांनी नुकसानभरपाईची मागणी केलीय.

First Published: Saturday, February 2, 2013, 21:34


comments powered by Disqus