Last Updated: Monday, October 21, 2013, 21:53
www.24taas.com, झी मीडिया, अंबाजोगाई तब्बल दीड वर्षापूर्वी घडलेल्या अंबाजोगाई येथील योगेश्वरी देवी मंदिरातील दरोडा प्रकरणाचा उलगडा झाला असून पोलिसांनी पाच जणांच्या टोळीला अटक केलीय.
घटनेपूर्वी १५ दिवस अगोदर योगेश्वरी देवी मंदिराची रेकी करून आठ दरोडेखोरांनी १७ एप्रिलच्या रात्री हा धाडसी दरोडा घालून ३२ तोळे सोन्यासह तीन किलो चांदी असा १५ ते २० लाखाचा माल पळवला होता. यातील सर्व आरोपी घरफोड्या आणि जबरी चोरी प्रकरणात राज्यात कुख्यात आहेत, तसेच सर्वावर मोक्का लावण्यात आलेला आहे.
योगेश्वरी देवीच्या मंदिरातील देवीच्या चेहऱ्यावरील सोन्याचे तोंड, कान, डोळे, सर्पल्या, सोन्याची फुले, चंद्रकोर, चांदीचा केवडा, फुले, पादुका असे दागिने चोरी झाले होते. जिल्ह्यासह कोकणस्थ भाविकांचे कुलदैवत असणाऱ्या योगेश्वरी देवीच्या मंदिरात चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली होती. जिल्ह्यातील पोलिसासह औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद येथील पोलीस पथकं या घटनेचा तपास करत होते. मात्र, त्यात मागील दीड वर्षांत काहीच हाती लागले नव्हते.
परंतु, चार-पाच दिवसांपूर्वी मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी पाच आरोपींना ताब्यात घेतले. यातील प्रत्येकी दोघे बुलढाणा आणि बीड जिल्ह्यातील असून एक जण उस्मानाबाद जिल्ह्यातील आहे. एक आरोपी मयत झाला असून दोन आरोपी अद्याप फरार आहेत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, October 21, 2013, 21:53