Last Updated: Saturday, November 16, 2013, 09:39
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईबाळासाहेबांच्या स्मृतिदिनाची जय्यत तयारी सुरू आहे. शिवाजी पार्कातल्या स्मृतिउद्यानात चोख व्यवस्था करण्यात आली आहे. देशभरातून लाखो शिवसैनिक शिवतीर्थावर दर्शन घेणार आहेत.
१७ नोव्हेंबरला बाळासाहेबांचा पहिला स्मृतिदिन आहे. त्याची जय्यत तयारी सुरू आहे. काल उद्धव ठाकरेंनी या स्मृतिउद्यानाची पाहणी केली आणि काही सूचनाही केल्या. बाळासाहेबांच्या या स्मृतिउद्यानात कसा प्रवेश मिळणार आहे, आणि एकूणच काय व्यवस्था असणार आहे. याचा काल आढावा घेण्यात आला.
१७ नोव्हेंबरला सकाळी सात वाजल्यापासून शिवसैनिकांना स्मृतिस्थळाचं दर्शन घेता येईल. शिवसैनिकांसाठी समर्थ व्यायाम मंदिराकडून दर्शन रांगेतून प्रवेश मिळेल. तर व्हीआयपींसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावरच्या शिवाजी पुतळ्याशेजारच्या प्रवेशद्वारातून प्रवेश मिळणार आहे. दर्शन रांगेतून येऊन स्मृती चौथ-यावर पुष्पांजली वाहण्याची व्यवस्था केलीय. अवजड वाहनं, बसेस आणि इतर वाहनांना सेनापती बापट मार्गावर पार्किंग करता येईल. शिवाजी पार्क परिसरातल्या रस्त्यांवर वाहनं उभी करायला परवानगी नाही. १० ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आलीय. कब्बड्डी असोसिएशनच्या शेजारी तात्पुरत्या प्राथमिक आरोग्य केंद्र आणि अँम्ब्युलन्स तैनात असेल
१७ नोव्हेंबर २०१२ अवघा महाराष्ट्र त्यादिवशी हेलावून गेला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या निधनाला रविवारी एक वर्ष पूर्ण होतंय. शिवसैनिकांसाठी त्यांचे साहेब म्हणजे अक्षरशः दैवत.... याच दैवताच्या स्मृतिदिनासाठी देशभरातून हजारो शिवसैनिक शिवाजी पार्कवर येणार आहेत. शिवाजी पार्कवर ज्या ठिकाणी बाळासाहेबांना अग्नी देण्यात आला, त्याच ठिकाणी महापालिकेच्या वतीनं स्मृति उद्यान तयार करण्यात आलंय.
याच स्मृति उद्यानाच्या जागेवर बाळासाहेबांनी षष्ठ्यब्दीनिमित्त गुलमोहराचं झाड लावलं होतं. आणि माँसाहेबांनी लावलेलं बकुळीचं झाडही इथेच बहरलं होतं.... त्या झाडांसह विविध फुलझाडं लावून हे स्मृति उद्यान सुगंधी आणि सुशोभित करण्यात आलंय.
बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्तानं शिवसैनिकांना शिवाजी पार्कवर आणण्याची जबाबदारी विभागप्रमुखांवर सोपवण्यात आल्याचं समजतंय. निवडणुकांचं घोडमैदानही जवळच असल्यानं इच्छुकही स्मृतिदिनाचं औचित्य साधत शक्तीप्रदर्शनाची संधी सोडणार नाहीत.
बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या आठवणी दाटून येतील आणि शिवाजी पार्कवरच्या साहेबांच्या आठवणीनं प्रत्येक शिवसैनिक हेलावून जाईल. पुन्हा एकदा मंत्रालयावर भगवा फडकवण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न अधुरंच राहिलंय. ते स्वप्न साकार झालं, तर ती बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, November 16, 2013, 09:39