बाळासाहेबांच्या गळ्यातील ताईत... `खास माणूस`, chapampasingh thapa balasaheb care taker

बाळासाहेबांच्या गळ्यातील ताईत... `खास माणूस`

बाळासाहेबांच्या गळ्यातील ताईत... `खास माणूस`
www.24taas.com, मुंबई

बाळासाहेब ठाकरे हे उभ्या महाराष्ट्रातील अनेकांचे गळ्यातील ताईत होते. पण बाळासाहेब यांच्या गळ्यातील ताईत कोणी झालं असेल तर त्यांचे सेवक चंपासिग थापा हे होय. २७ वर्षांपूर्वी ते नेपाळहून मुंबईत आले . गोरेगावात रस्त्यावर काही तरी छोटीमोठी ते कामे करत असत . शिवसेनेचे भांडुपमधील तत्कालीन नगरसेवक दिवंगत के . टी . थापा यांच्या संपर्कामुळे ते ` मातोश्री ` त शिवसेनाप्रमुखांचे सेवक म्हणून रुजू झाले. बाळासाहेबांचे जेवण, औषधे अशा प्रत्येक बारीकसारीक गोष्टीची माहिती थापा यांनी जाणून घेतली . त्यामुळे अल्पावधीतच ते शिवसेनाप्रमुखांच्या गळ्यातील ताईत बनले. थापांचा सेवाभाव , काम करण्याची धडाडी यामुळे शिवसेनाप्रमुख त्यांच्यावर पुत्रवत प्रेम करत . मीनाताई ठाकरेंनतर शिवसेनाप्रमुखांची काळजी घेणारी दुसरी व्यक्ती म्हणून त्यांची ओळख झाली . बाळासाहेबांच्या शेवटच्या श्वासापर्यंत ते त्यांची सावली बनून राहिले .

` मातोश्री ` त शिवसेनाप्रमुखांच्या रूमशेजारीच थापा यांची छोटी खोली आहे . बाळासाहेब सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्यांना लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी थापांची धावपळ सुरू असायची . थापा यांना तीन मुले आणि एक मुलगी आहे . दोन मुलांची नेपाळमध्ये मेडिकलची दुकाने असून एक मुलगा व्यवसायानिमित्त दुबईत असतो . थापांचे कुटुंब नेपाळमध्ये असले तरी त्यांचे सर्वस्व ` मातोश्री ` त आहे . बाळासाहेबांच्या वाढदिवसाला दरवर्षी नेपाळमधून रुद्राक्ष आणून त्याने त्यांची तुला करायची आणि ती वाटायची या शिवसनेच्या नेपाळ शाखेच्या उपक्रमात थापा हिरीरीने पुढाकार घेत . नेपाळमधील शिवसैनिकांना थापा हा नेहमीच आधार वाटत राहिला आहे .

बाळासाहेब मुंबईबाहेर दौऱ्यावर जाताना त्यांची बॅग भरण्यापासून त्यांना आवश्यक त्या गोष्टी बॅगेत घेतल्या आहेत की नाही याची खबरदारी थापा घेत . बाळासाहेबांचे आवडते लेखक पु . ल . देशपांडे यांच्या एकपात्री प्रयोगाच्या कॅसेट्स , सीडी , प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या व्याख्यानाच्या सीडी घ्यायला थापा कधीच विसरत नसत . बाळासाहेबांच्या सुरक्षारक्षकांच्या नजरेमधून थापा यांचीही नजर फिरत असे .

शिवसेनाप्रमुखांच्या व्यस्त अशा दैंनदिन कार्यक्रमामुळे थापा यांना सारखे नेपाळला जाणे शक्य नव्हते . त्यामुळे दोन वर्षांतून एकदा ते नेपाळला जात असत . शिवसेनाप्रमुखांना भेटायला येणारी मंडळी थापा यांना दिवाळी वगैरे सणात काही भेटवस्तू देत असत . त्या वस्तू साठवून ठेवून नेपाळला जाताना ते घेऊन जात . या भेटवस्तू इतक्या असत की त्यांना एक ट्रेनची अख्खी बोगी बुक करावी लागत असे . या भेटवस्तू ते नेपाळमध्ये जाऊन लोकांना वाटत असत . आपल्या गावचा माणूस शिवसेनाप्रमुखांसारख्या बड्या नेत्याच्या सानिध्यात असतो याचे गावकऱ्यांना खूप कौतुक वाटत असे . त्या प्रेमापोटी त्यांचा गावात ठिकठिकाणी सत्कारही करण्यात येत असे .

First Published: Tuesday, November 20, 2012, 16:09


comments powered by Disqus