पाकड्यांबरोबरचे सामने उधळून लावा - बाळासाहेब , Do not play cricket with Pakistan -Balasaheb Thackeray

पाकड्यांबरोबरचे सामने उधळून लावा - बाळासाहेब

पाकड्यांबरोबरचे सामने उधळून लावा -  बाळासाहेब
www.24taas.com, मुंबई

भारत-पाकिस्तान क्रिकेट सामने खेळण्याबाबतच्या निर्णयाचा शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी ठाकरी शैलीत समाचार घेतलाय. झाले गेले कसे विसरायचे ? असा केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंना सवाल करत सामने उधळून लावण्याचा आदेश देशप्रेमींना दिलाय.

सामनामध्ये बाळासाहेबांनी दिलेल्या निवेदनात गृहमंत्र्यांना चांगलंच फटकारलंय. बघूया बाळासाहेब काय म्हणतायेत.पलंगावर अस्वस्थ स्थितीत असतानाही देशहितासाठी माझे रक्त स्वस्थ बसू देत नाही म्हणून हे निवेदन इतक्या तळमळीने माझ्या हिंदू बांधवांना मी करीत आहे.

झाले गेले विसरून जाऊया व पाकिस्तानशी क्रिकेट खेळूया या गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या ठाकरे यांनी कडक शब्दांत समाचार घेतला. शिवसेनाप्रमुख आज अक्षरश: कडाडले, ‘‘शिंदेसाहेब, थोडी जरी तुमच्यात लाजलज्जा शिल्लक असेल तर हे निर्लज्ज वक्तव्य मागे घ्या. नाही तर जेथे जेथे हे पाकिस्तानचे क्रिकेट सामने होणार आहेत तेथील कडवट हिंदू, स्वाभिमानी, देशाभिमानी जनता हे सामने होऊ देणार नाही!’

‘अहो शिंदेसाहेब, कशाला हिंदुस्थान-पाकिस्तान क्रिकेट सामने खेळवण्याचा नादानपणा आपण करीत आहात? आणि किती निर्लज्जपणाने आपण बोलता की, झाले गेले विसरून जाऊया.’ पण काय विसरायचे आणि कसे विसरायचे?
छत्रपती शिवाजी टर्मिनसवर पाकड्या अतिरेक्यांनी केलेला रक्तपात आपण इतक्या सहजपणे विसरू शकतो? हिंदुस्थान-पाकिस्तानचे हिंसक संबंध फाळणीपासून सर्वश्रुत आहेत. त्यांनी हिंदुस्थानच्या सार्वभौमत्वावर घातलेला प्रत्येक घाव कसा विसरायचा?

‘२६/११’ चा घाव तर ताजा आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनसवर शेकडो असहाय्य निरपराध मारले गेले. त्या पाकिस्तानी अतिरेकी कसाबने अंदाधुंद गोळीबार केला. त्या नराधम कसाबची केस अद्याप चालूच आहे. त्याच्या फाशीचा दया अर्ज महाराष्ट्र सरकारने फेटाळला. आज अर्ज तुमच्या केंद्रात आहे. तोही अर्ज फेटाळून लावा, अशी महाराष्ट्र सरकारची मागणी आहे. त्या अफझल गुरूलाही फाशी ठोठावून ११ वर्षे झाली. आपल्या सार्वभौम संसदेवर त्याने हल्ला केला. त्या हल्ल्यात ६ जवान शहीद झाले. ते अतिरेकी त्यावेळी आत घुसले असते तर आपल्या तिरंग्याचा रंग हिरवा झाला असता, याचे तुम्हाला काहीच वाटत नाही?

आता तो अबू जिंदाल पकडला आहे. त्याच्यावरही खटला चालेल व फाशी ठोठावली जाईल. नंतर हा जिंदालही फाशीची सजा रद्द करा म्हणून दयेचा अर्ज करणारच आहे. तोही दयेचा अर्ज आपण फेटाळून लावणार की भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटचे सामने पाहण्यासाठी स्टेडियममध्ये जाऊन बसणार? पाकिस्तानच्या अतिरेकी कारवाया हिंदुस्थानच्या भूमीवर चालूच आहेत, नव्हे दिवसेंदिवस त्यांचा उच्छाद वाढतोच आहे. त्यांना चिरडण्याचे राहिले बाजूला, उलट त्यांच्याबरोबर क्रिकेटचे सामने खेळवले जात आहेत. खरोखरच असे नादान नेते या देशाला मिळाले हे या देशाचे दुर्दैवच म्हणायला हवे.

शिंदेसाहेब, थोडी जरी लाजलज्जा शिल्लक असेल तर भारत-पाकिस्तान क्रिकेट सामने खेळविण्याचे वक्तव्य मागे घ्या, नाहीतर मुंबई, महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सर्व कडवट हिंदू, स्वाभिमानी देशप्रेमींना माझे कळकळीचे आवाहन आहे की, जिथे जिथे या पाकड्यांचे सामने असतील तिथे तिथे हे सामने होऊ देऊ नका. उधळून लावा. पाहूया काय होते ते!

First Published: Monday, November 5, 2012, 08:25


comments powered by Disqus