Last Updated: Saturday, November 17, 2012, 22:07
www.24taas.com, मुंबईउद्या बाळासाहेबांच्या दुःखद निधनामुळे मुंबईमध्ये अघोषित बंद पुकारण्यात आला आहे. उद्या दादार येथे बाळासाहेबांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी शिवतीर्थावर ठेवण्यात येणार आहे. यावेळी सर्व शिवसैनिकांनी सार्वजनिक वाहनांतून वाहतूक करून यावं असं आवाहन करण्यात आलंय. उद्या मुंबईतील सर्व पेट्रोल पंप बंद ठेवण्यात येणार आहेत. तसंच मुंबईतील सर्व रिक्षा आणि टॅक्सी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रविवारी मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेमार्गावरचा प्रस्तावित मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. देशभरातून येणा-या शिवसैनिकांना तसेच सर्वसामान्यांना बाळासाहेब ठाकरे यांचे अंत्यदर्शन घेता यावे यासाठी हा मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात उत्स्फूर्तपणे बंद
बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाची बातमी कळताच मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये व्यापा-यांनी पटापट दुकाने बंद केली. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या दादर परिसर, लालबाग, परळ इथपासून ठाणे, नाशिक, पुणे, औरंगाबाद इत्यादी शहरांमध्ये दुकाने बंद करण्यात आली आहे.
ही दुःखद बातमी कळताच शिवसेना भवन परिसरात लोकांनी पटापट दुकाने बंद केली. यावेळी अनेक जण रडताना दिसत होती.
मुंबईत शांतता राखण्याचं आवाहन
मुंबईत शांतता राखून रेल्वे सेवा आणि बस सेवा या सार्वजनिक वाहतुकीमध्ये अडथडे निर्माण करू नका असं आवाहन शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे.
First Published: Saturday, November 17, 2012, 22:07