Last Updated: Monday, November 19, 2012, 19:12
www.24taas.com,मुंबई शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उत्सफुर्त मुंबईत बंद पुकारण्यात आला होता. या बंदची काय गरज होती, असा सवाल फेसबुकवर विचारणा-या आणि या पोस्टला लाइक करणा-या अशी दोन मुलींना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यसंस्कारा दिवशी बंदची काय गरज होती, असा प्रश्न एका मुलीने उपस्थीत केला होता. या पोस्टला तिच्या मैत्रीणीने लाइक केले होते. या संदर्भात काही शिवसैनिकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी काही तासातच या दोघींना अटक केली. या दोन मुलींना न्यायालयात हजर केले असता त्यांना १४ दिवसांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शनिवारी दुपारी निधन झाले होते. त्यानंतर रविवारी होणा-या अंत्यसंस्कारासाठी मुंबईतील सर्व दुकाने तसेच अन्य व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. रविवारी शिवसेनाप्रमुखांवर शिवाजीपार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात आले होते. यावेळी आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी लाखो शिवसैनिक शिवाजी पार्कवर आले होते.
First Published: Monday, November 19, 2012, 19:05