Last Updated: Thursday, November 29, 2012, 14:26
www.24taas.com, मुंबई शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यसंस्काराच्या जागेवर स्मारक उभारण्यासाठी शिवसेना आग्रही नाही. मात्र, ही जागा शिवसेनेसाठी पवित्र जागा आहे, त्यामुळे शिवाजी पार्कवरील या जागेवर शिवसेनेचाच हक्क राहील, असं दमच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीला दिलाय.
स्मारकाच्या जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेसने विरोधाचं राजकारण केलं तर मैदानं आणि उद्यानांच्या आरक्षणाबाबत राष्ट्रवादीने केलेले घोटाळे जनतेसमोर आणू, असंही राऊत यांनी म्हटलंय. ‘झी २४ तास’शी बोलताना राऊत यांनी, ‘शिवसेनाप्रमुखांवर अंत्यसंस्कार झालं ती काही फार मोठी जागा नाही. याच ठिकाणावर शिवसेनाप्रमुखांचं स्मारक उभारायचंय असं शिवसेनेनं कधीही म्हटलेलं नाही. मात्र, जागेचं पावित्र्य कायम राखलं जाईल हीच शिवसेनेची भूमिका आहे...’ असं म्हणत राऊत यांनी या जागेवर शिवसेनेचाच हक्क असल्याचा दावा केलाय.
‘मुंबईतील उद्यानं आणि मैदानं बिल्डरांच्या घशात कशी गेली आम्हाला माहित आहे, ते जर आम्ही उघड केलं तर राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांना पळता भुई थोडी होईल. तेव्हा नवाब मलिक यांनी विचार करून बोलावं’ असं म्हणत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनाही चांगलाच दमही भरलाय.
First Published: Thursday, November 29, 2012, 14:18