Last Updated: Thursday, November 15, 2012, 19:19
www.24taas.com, मुंबई एकीकडे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे तर दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं ऊस दरवाढीसाठी सुरू केलेलं आंदोलनही अजून थंड झालेलं नाही. या आंदोलनाचा फटका शिवसैनिकांना बसू नये, यासाठी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आवाहन केलंय.
ऊस दरवाढीसंदर्भात राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या आठवड्यात सुरू झालेलं आंदोलन आजही सुरूच आहे. राजू शेट्टी हे सध्या तुरुंगात असले तरी ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी आज रास्ता रोको आंदोलन सुरूच ठेवलंय. अर्थात, याचा फटका राज्यभरातून बाळासाहेब ठाकरेंच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी निघालेल्या शिवसैनिकांनाही बसतोय. बाळासाहेब ठाकरेंची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजल्यानंतर राज्यभरातून हजारो शिवसैनिक मुंबईच्या दिशेने रवाना झालेत. मात्र, ऊसदर वाढीच्या आंदोलनामुळे त्यांची वाहने रस्त्यातच अडवण्यात येत आहेत. याची माहिती मिळाल्यानंतर शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी, शिवसैनिकांच्या गाड्या अडवू नका असे आवाहन आंदोलकांना केलंय. तसंच शिवसैनिकांनाही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहनं शिवसेनेनं केलंय.
First Published: Thursday, November 15, 2012, 19:19