शिवसेनाप्रमुख आणि मी ! - Marathi News 24taas.com

शिवसेनाप्रमुख आणि मी !

शिवसेनाप्रमुख आणि मी !
संतोष गोरे


२६ सप्टेंबर १९९३. स्थळ - मराठवाडा सांस्कृतिक मैदान, संभाजीनगर. याच ठिकाणी माझी शिवसेनाप्रमुखांबरोबर पहिली भेट झाली. अर्थात मैदानातल्या लाखो शिवसैनिकांमधला मी एक. विराट सभेला मार्गदर्शन करताना पहिल्यांदाच बाळासाहेबांना मी पहात होतो. प्रसंग होता 'सामना'च्या मराठवाडा आवृत्तीच्या प्रकाशनाचा. याच काळात शिवसेनेची मराठवाड्यात घोडदौड सुरू होती. अर्थात तेव्हाच्या शेठजींच्या वृत्तपत्रात शिवसेनेच्या विरोधातल्याच बातम्या छापल्या जात होत्या. त्यामुळे शिवसेनेला विरोधकांना प्रत्त्युत्तर देण्यासाठी आणि पक्षाची दिशा शिवसैनिकांपर्यंत पोचवण्यासाठी वृत्तपत्राची गरज होती. ती मराठवाडा आवृत्तीच्या निमीत्तानं पूर्ण झाली. त्याचवर्षी मुंबईत दंगली आणि बॉम्बस्फोट झाले होते. या सर्व घटनांचा आढावा घेत शिवसेनाप्रमुखांची तोफ धडधडत होती.


तेव्हा मी १७ वर्षांचा होतो. बहुतेक त्यानंतरच शिवसेनेचं नाशिकला भव्य अधिवेशन झालं. अधिवेशनात देवीला घातलेलं 'दार उघड बये दार उघड' हे साकडं शिवसेनेला सत्तेकडे नेणारं ठरलं. या अधिवेशनासाठी नक्षत्रवाडीतून मी आणि बाबासाहेब राऊत हे दोघे गेलो होतो. नाशकातल्या गोल्फ क्लब मैदानावर विराट जाहीर सभेनं अधिवेशनाची सांगता झाली होती. संध्याकाळी पाच वाजल्यापासूनच शहरातले सारे रस्ते राज्यभरातून आलेल्या शिवसैनिकांच्या भगव्या वादळानं ओसंडून वाहत होते. शिवसेनाप्रमुखांनी दिलेला 'विधानसभेवर भगवा फडकवण्याचा' आदेश प्रत्यक्षात आणण्यासाठी शिवसैनिकांचं वादळ त्या मैदानावरून राज्यात वेगानं पसरलं.

१९९५ मध्ये शिवसेनाप्रमुखांचं वादळ राज्यभर फिरत होतं. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झालेल्या सभेत पुन्हा एकदा शिवसेनाप्रमुखांचे विचार ऐकण्याची संधी मिळाली. दुसऱ्याच दिवशी शिवसेनाप्रमुखांची पैठणला सभा होती. संभाजीनगर - पैठण मार्गावर असलेल्या नक्षत्रवाडीतल्या आमच्या शाखेनं शिवसेनाप्रमुखांचं स्वागत केलं होतं. एका मिनीटासाठी का होईना, शिवसेनाप्रमुखांना जवळून पाहण्याची संधी आमच्या सर्व शिवसैनिकांना मिळाली होती.मनी - मसल्स अशा सर्वच अर्थाने प्रबळ असलेल्या काँग्रेसला आव्हान देणं सोपं नव्हतं. मात्र शिवसेनाप्रमुखांचे धगधगते विचार आणि 'जय भवानी जय शिवाजी' ही घोषणा. बस्स इतक्याच भांडवलावर विधानसभेवर भगवं निशाण फडकवण्यात शिवसेना आणि शिवसैनिकांना यश आलं.

शिवसेनाप्रमुख आणि मी !

१९९५ मध्येच संभाजीनगर महापालिकेची निवडणूक जाहीर झाली. त्यावेळी पुन्हा एकदा मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर शिवसेनाप्रमुखांचे विचार ऐकण्याची संधी मिळाली. औरंगाबादचे संभाजीनगर तर करणारच पण खुल्ताबाद, दौलताबाद यांचंही नामांतर करू. ज्या शहरांच्या नावात 'बाद' आहे ते बाद करू अशी खास ठाकरी शैलीही त्यांनी दाखवून दिली.
बहुधा याचवर्षी मी मुंबईत होणा-या दसरा मेळाव्यालाही हजेरी लावली होती. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या काही दिवस आधी शिवतीर्थावर पांडुरंग शास्त्री आठवलेंच्या स्वाध्याय परिवाराचा भव्य कार्यक्रम झाला होता. त्याचा शिवसेनाप्रमुखांनी आदरानं उल्लेख केला. 'हिंदू धर्मीय संघटित होतात ही आनंदाची बाब आहे. मात्र पांडूरंग शास्त्री आणि माझा मार्ग वेगळा आहे. ते पांडूरंग शास्त्री आहेत, तर मी दांडूरंग शास्त्री आहे', असं सांगत शिवसेनाप्रमुखांनी सभा जिंकली.

१९९६ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळी पुन्हा एकदा शिवसेनाप्रमुख आणि माझी मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर भेट झाली. अर्थात लाखोंच्या गर्दीतला मी एक. यावेळी शिवसेनाप्रमुखांनी युतीच्या मंत्रिमंडळातून काढण्यात आलेल्या अशोक पाटील डोणगावकरांवर तोफ डागली. अपक्ष आमदार असलेल्या डोणगावकरांना राज्यमंत्री करण्यात आलं होतं. मात्र सरकारवर टीका करण्याची त्यांची खुमखुमी होती. परिणामी त्यांची गच्छंती झाली. 'डोणगावकरांना पंचपक्वानांचं ताट वाढलं होतं. मात्र त्यांना मूत कालवून खाण्याची सवय', अशा खास ठाकरी शैलीत त्यांनी समाचार घेतला. खमंग फोडणी - शिवसेनाप्रमुखांनी दिलेला ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारणाचा मंत्र आज किती गरजेचा आहे, हे लक्षात येऊ लागलं आहे.

First Published: Saturday, January 21, 2012, 23:55


comments powered by Disqus