उद्धव यांचा राज्यव्यापी दौरा, Uddhav Thackeray, shivsena

उद्धव यांचा राज्यव्यापी दौरा

उद्धव यांचा राज्यव्यापी दौरा
www.24taas.com,मुंबई

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे १५ दिवसांचा राज्यव्यापी दौरा करणार आहेत. आजपासून कोल्हापूर येथून त्यांच्या या दौ-याला सुरूवात होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करणार आहेत.

कोल्हापूरातील शाहू मार्केट यार्डमध्ये दुपारी एक ते तीन यावेळेत होणा-या मार्गदर्शन शिबिराला कोल्हापूर,सांगली,सातारा,पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील बाराशे पदाधिकारी आमदार,खासदार आणि नगरसेवक उपस्थित रहाणार आहेत. या शिबिराची जय्यत तयारी झाली असून दुपारी बारा वाजता खास विमानाने उद्धव ठाकरे मुंबईहुन कोल्हापूरकडे रवाना होतील. त्यानंतर दुपारी एक वाजता त्याचे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे उजळाईवाडी विमानतळावर त्यांचे आगमन होईल,तेथून ते थेट महालक्ष्मी देवीच्या दर्शनाला जाणार आहेत.

उद्धव शाहू सांस्कृतिक केंद्रात पदाधिकारी मेळावा घेणार आहेत. त्यानंतर औरंगाबादमध्ये १६ डिसेंबरला उद्धव यांची जाहीर सभा होईल. बाळासाहेबांच्या पश्चात शिवसेनेचं भवितव्य काय? उद्धव ठाकरे शिवसेनेला कितपत पुढे नेऊ शकतील? असे अनेक प्रश्न सध्या सगळ्यांच्या मनात आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या दौ-याबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे.

दरम्यान, बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर पक्ष नेत्यांची महत्वपूर्ण बैठक काल मातोश्री इथं झाली. यावेळी शिवसेनाप्रमुखपदाचे सर्वाधिकार शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना देण्यात आलेत. त्यानंतर त्यांचा हा पहिला दौरा आहे.

First Published: Monday, December 3, 2012, 12:30


comments powered by Disqus