श्रावणात का असतो मांसाहार वर्ज्य? - Marathi News 24taas.com

श्रावणात का असतो मांसाहार वर्ज्य?

www.24taas.com, मुंबई
 
श्रावण महिना आला की बऱ्याच जणांचा हिरमोड होतो तो मांसाहार सोडण्याच्या परंपरेमुळे. आपल्या शास्त्रांमध्ये भोजनासंदर्भात अनेक नियम सांगितले आहेत. सात्विक आहार हा ही त्यातील एक नियम आहे. मात्र, श्रावण महिन्यात हा नियम अधिक काटेकोर होतो. काही लोक श्रावणातही मांसाहार करतात. मात्र धर्मानुसार तो वर्ज्य आहे. यामागचं प्रमुख कारण म्हणजे या महिन्यात मांसाहार केल्यास वेगवेगळ्या व्याधी जडू शकतात. अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात. त्यामुळे धर्मशास्त्राप्रमाणेच आरोग्यशास्त्रही श्रावणात मांसाहार करायची परवानगी देत नाही.
 
पावसाळ्यातील वातावरण हे दमट, ओलसर आणि खराब असते. या काळात रस्त्यावरचं खाद्यही आपण आज वर्ज्य करतो. हेच कारण धर्मशास्त्रांनी दिलं आहे. पावसाळी वातावरणात मांसावरील बॅक्टेरिया वेगाने वाढतो. उन्हाळ्यात उष्णता, सूर्यप्रकाश यामुळे बॅक्टेरिय़ा वाढू शकत नाही. मात्र पावसाळ्यात हे जीवाणू, विषाणू वेगाने वाढतात. त्यामुळे पावसाळ्यातला पर्यायाने श्रावणातला मांसाहार हा अनेक रोगांना आमंत्रण देत असतो.
 
माश्यांचा प्रजनन काळही हाच असतो. या काळात मासे खाणं चालू ठेवल्यास माशांच्या प्रजातीच संपून जायची भीती असते. त्यामुळे वर्षभर खाण्यासाठी नवे मासे जन्मावेत, यासाठी श्रावणात मासे खाणं अनुचित मानतात. धर्मशास्त्रात सांगितलेल्या गोष्टींना अशा प्रकारचा एक शास्त्रीय आधार असतो. याच कारणास्तव श्रावणात मांसाहार टाळावा.
 

First Published: Tuesday, July 24, 2012, 17:07


comments powered by Disqus