Last Updated: Tuesday, November 8, 2011, 12:27
झी २४ तास वेब टीमपुराणकथेनुसार सिंहीका राक्षसाचा स्वरभानू नामक पुत्र होता. हा स्वरभानू प्रचंड शक्तीशाली होता. या स्वरभानूने ब्रह्मदेवाची कठोर तपःश्चर्या केली. ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने स्वरभानूला ब्रह्मांडात स्थानही मिळालं.
समुद्र मंथनानंतर अमृतावरुन देव-दानवांमध्ये संघर्ष झाला. तेव्हा भगवान विष्णू मोहिनी रुपात प्रकट झाले. त्यांनी देव-दानवांची पंगत बसवून त्यांना अमृत वाटू लागले. अत्यंत हुषारीने मोहिनीरुपी विष्णूंनी केवळ देवतांनाच अमृत पाजलं. ही गोष्ट दानवांच्या लक्षातच आली नाही. मात्र, स्वरभानूला ही गोष्ट समजली. अमृत वाटत असताना विष्णूंनी स्वरभानूला देवता समजून त्यालाही चुकून अमृत पाजले गेले. ही गोष्ट सूर्याने आणि चंद्राने ओळखली. त्यांनी विष्णूंना त्यांच्या चुकीची कल्पना करुन दिली. विष्णूंनी ताबडतोब आपल्या सुदर्शन चक्राने स्वरभानूचे दोन तुकडे केले. परंतु, अमृतप्राशन केल्यामुळे स्वरभानू जिवंत राहिला. मात्र, त्याचे मस्तक वेगळे आणि धड वेगळे झाले. स्वरभानूचे मस्तक ‘राहू’ या नावाने संबोधले जाते, तर सापसारखे असणारे त्याचे धड ‘केतू’ या नावाने ओळखले जाते.
राहू-केतू इतर ग्रहांच्या विरुद्ध दिशेने फिरतात. वैदिक मान्यतेनुसार राहू आणि केतू हे दोन संपात बिंदू असून या दोन ग्रहांच्या दरम्यान बाकी सर्व ग्रहा असतील, तर त्या कुंडलीत कालसर्प योग तयार होतो. कुंडलीतली अशी ग्रहरचना माणसाच्या अधःपतनास कारणीभूत ठरते.
First Published: Tuesday, November 8, 2011, 12:27