‘ती'चं अस्तित्व धोक्यात... - Marathi News 24taas.com

‘ती'चं अस्तित्व धोक्यात...

जान्हवी सराटे
 

लक्ष्मीच्या पावलांनी दीपावली येते..,
नवरात्रीच्या जागराने दुर्गा पावते..,
वटपौर्णिमेच्या दिवशी सावित्री दिसते..,
तरीही गर्भातील चिमुकलीला जन्माआधीच मारले जातेय. हे सांगण्याचे कारण की महाराष्ट्रात होणारी स्त्री भ्रूण हत्या.
 
 

स्त्री भ्रूण हत्येसंदर्भात राज्यात कारवाईचा उहापोह केला जातोयं. मात्र स्त्री भ्रण हत्येला लागलेली किड सधन जिल्ह्यातही पोहोचली आहे. राज्यात मुलीची घटती संख्या चिंताजनक आहे. २००१ मध्ये कोल्हापुरातील पन्हाळा तालुका डेंजर  झोनमध्ये आल्यानंतरही  प्रशासनाला जाग  आली नाही. "सेव्ह द बेबी गर्ल" चा डंका राज्यभर वाजत असताना या उपक्रमाचे माहेर घर असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात मात्र गत वर्षात कोल्हापुरातील ४० हजार कळ्या खुडल्या गेल्या.
 
राज्यातही असं कृत्य करणाऱ्याला शिक्षा झाल्याची फारशी उदाहरणं नाहीत.सरकार फक्त कारवाई आणि अहवालांचा धिंडोरा जरी पिटत असली तरी या आधी स्त्रीभ्रूणहत्येसंदर्भात राज्यात नऊ वर्षात केवळ ३१७ खटले दाखल आहेत. यातील शिक्षा झालेले हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच तर अनेक खटले प्रलंबित आहेत. असे कृत्य करणार्या नराधमाना कायद्यातही अनेक पळवाटा आहेत. आजही स्त्रीभ्रूणहत्या  रोखण्यासाठी सक्षम कायद्याची गरज आहे. त्यामुळे राज्यात एकामागे एक उघडकीस येणाऱ्या प्रकारात सरकाची भूमिका मात्र अहवालाच्या भोवऱ्यात अडकलेली दिसते.
 
स्त्रीभ्रूणहत्या हा प्रश्न आता राष्ट्रपातळीवर महत्त्वाचा प्रश्न होऊ लागला आहे. गरिबी, बेकारी, वाढती लोकसंख्या या प्रश्नप्रमाणेच आता या प्रश्नाकडे पाहिलेज पाहिजे. मात्र ही प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी अगदी तळापासून प्रयत्न होणं गरजेचं आहे. "ती" ला वाचविण्यासाठी सरकार लेक वाचवा अभियानासारखे अभियान सुरु केले खरे पण त्याचा म्हणावा तितका सकारात्मक परिणाम झालाच नाही.
 
 
बीड जिल्यातील स्त्रीभ्रूणहत्येचे रॅकेट उघडकीस आल्यानंतर कोल्हापुरातही असे रॅकट उघडकीस आले. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन, महापालिका, आरोग्य अधिकार्यांनी तपासणीची मोहीम हाती घेतली. आणि ही मोहीम राज्यभर सुरु असतानाही सोलापूरसह  राज्यात अनेक जिल्ह्यांत स्त्रीभ्रूणहत्येचे वास्तव पुढे येऊ लागले आहे. प्रशासनाने सरकारी कागदी घोड नाचविण्या ऐवजी खऱ्या अर्थाने कृती करण्याची वेळ आली आहे.
 

आजही राज्यात २५  हजार अनधिकृत सोनोग्राफीसेंटर आहेत. या प्रकरामुळे आता डॉक्टरांबरोबर असे कृत्य करण्यास परावृत्त करणाऱ्या नातेवाईकांवर कारवाई झाली पाहिजे. हे रॅकेट नुसते नातेवाईक आणि डॉक्टरांमध्ये नसून यामध्येही एजंटांनी शिरकाव केलायं. वंशाचा दिवा मुलगाच हवा या विकृत मनोवृत्तीमुळे आज ही राज्यात लाखो मुली गर्भातच खुडल्या जातायेत. अशा गर्भपाताच्या कृत्यातून राज्यात कोट्यवधीची उलाढाल होतीयं. अपप्रवृत्तीमुळे डॉक्टरी पेशाला काळीमा फासला जात आहे. केवळ जनजागृती, रॅली काढून तसेच आंदोलनाने हा प्रश्न सुटणार नाही. असे कृत्य घडणाऱ्या ठिकाणी कारवाई होण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी प्रशासनाला दबाव निर्माण करण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेण्याची वेळ आलीयं.
 
एकीकडे मुलगा हवा या हट्टसापोटी मुलीला मारलं जातयं. तर दुसरीकडे वंशाला पणतीच हवी म्हणारे आज कोल्हापुरात आहेत. मुलगी हवी या मानसिकतेतून मुली दत्तक घेण्याची संख्या मुलांपेक्षाही अधिक आहे. वंशाला पणती म्हणाऱ्यांचा बोध घेण्याची गरज आहे. गर्भात वाढणाऱ्या चिमुकलीला जगण्याचा हक्क कायद्याने दिलायं. मात्र कायदाच धाब्यावर बसविणाऱ्यांना सरकारचं पाठबळ मिळतयं, हीच मोठी शोकांतिका वास्तव म्हणून पुढे येतीयं.

First Published: Monday, July 9, 2012, 19:23


comments powered by Disqus