१९५७ची राष्ट्रीय दिनदर्शिका दुर्लक्षित ! - Marathi News 24taas.com

१९५७ची राष्ट्रीय दिनदर्शिका दुर्लक्षित !

 प्रा. कैलास गांधी, दापोली
 
केंद्र सरकारने २२ मार्च १९५७  रोजी स्वीकारलेली राष्ट्रीय दिनदर्शिका दुर्लक्षित झाली आहे. या उदासीनतेमुळे सुमारे ५४ वर्षाचा कालखंड उलटूनही कित्येक भारतियांना अशी दिनदर्शिका आहे याचीही माहिती नसल्याचे चित्र दिसते.
 
राष्ट्रीय दिनदर्शिका तयार करण्यासाठी भौतिकशास्त्रातील शास्त्रज्ञ डॉ. मेघनाथ साहा यांच्या अध्यक्षतेखाली पंचाग सुधारणा समिती नेमण्यात आली. या समितीने तत्कालीन कालगणनेच्या अस्तित्वात असलेल्या सर्व पद्धतींचा अभ्यास केला. सूर्य-चंद्राचे वार्षिक भ्रमण, धार्मिक सण, उत्सव, खगोलशास्त्रीय सिद्धांत यांचा सखोल अभ्यास करून एक राष्ट्रीय दिनदर्शिका तयार करण्यात आली. केंद्र सरकारने ती २२ मार्च १९५७  या दिवसापासून अधिकृतपणे स्वीकारल्याचे जाहीर केले.
 
 

चंद्रमासाचा ऋतूंशी मेळ राहत नाही. ऋतू सूर्यभ्रमणावर निश्चित होत असल्याने सूर्याचे वार्षिक भ्रमण विचारात घेतलेली दिनदर्शिकाच व्यवहारात उपयोगी पडते, हे लक्षात घेऊन डॉ. साहा यांच्या समितीने सध्या प्रचलित असलेल्या इंग्रजी (ग्रेगोरियन) दिनदर्शिकेपेक्षा वेगळी व वैशिष्टय़पूर्ण सौर दिनदर्शिका सुचवली. तिचा स्वीकारही करण्यात आला.
 
 
 
इंग्रजी कालगणनेत अनेक उणिवा असल्याने भारतीय सौर गणनेत वर्षारंभ २२ मार्च या दिवशी ठरवण्यात आला सूर्य ६ महिने उत्तर तर ६  महिने दक्षिण गोलार्धात झुकलेला असतो. उत्तर गोलार्धातील कालावधी अधिक असल्याने वैशाख ते भाद्रपद हे पाच महिने ३० दिवसांचे तर कार्तिक ते फाल्गुन हे सहा महिने ३० दिवसांचे धरले जातात. लिप वर्षात चैत्र महिना ३१ दिवसांचा तर इतर वेळी ३०  दिवसांचा पकडण्यात येतो. राष्ट्रीय कालगणनेत वर्षाची गणना करताना शालिवाहन शतकाचाच उपयोग करण्यात आला आहे.
 
 
इंग्रजी दिनदर्शिकेतील तारखांप्रमाणे राष्ट्रीय दिनदर्शिकेतील (शक सवंत) तारखा घालून दिलेले धनादेश स्वीकारण्याबाबत रिझव्‍‌र्ह बॅँकेने परिपत्रक काढलेले असून, रिझव्‍‌र्ह बँकेच्या ‘क्रेडिट इन्फर्मेशन रिव्ह्यू’ च्या सप्टेंबर १९९२ (अंक क्र. १५८) मध्ये याचा संदर्भ सापडतो. मात्र, तरीही राष्ट्रीय दिनदर्शिकेकडे दुर्लक्षच झाले आहे.

First Published: Tuesday, January 10, 2012, 14:56


comments powered by Disqus