Last Updated: Wednesday, December 21, 2011, 12:40
गुरू ठाकुर नटरंग चित्रपटातलं माझं ‘अप्सरा आली’ प्रचंड लोकप्रिय झालं.. त्यानंतर मला अनेकांनी अनेकवेळा विचारलं ‘अप्सरा आली’ हे एका सौंदर्यवतीचे वर्णन असले तरी लिहीताना तुमच्या नजरेसमोर नेमकं कोण होतं? खरं सांगायचं तर स्वत: लावणीच. ‘नटरंग’च्या निमित्ताने लावणी या साहित्य प्रकाराचा सखोल अभ्यास करताना तिनं मला इतकी भुरळ घातली की मला ती जणु एखाद्या अप्सरे सारखी वाटू लागली… एखाद्या शाहिराच्या नजरेने तिच्याकडे पहाताना जाणवलं की लावण्यवती लावणी ही जणु काही साहित्यप्रकारातली अप्सराच आहे.
कोमल काया की मोहमाया? खरंच तिने भल्याभल्यांना भुरळ घातली. रंगेल रसिकांची बात सोडा अगदी शब्दप्रभू पंडीत विद्वान अगदी संत कवींनाही! तिची अदा, तिची नजाकत, तिच्या सौदर्यांच्या छटा पाहिल्या अन् जाणवलं की ही नुसतीच लावण्यवती नाही तर शृंगार रसात नटुन थटुन जणु ती एखाद्या अप्सरे सारखी पृथ्वीतलावर उमटली आहे आणि कस्तुरीसारखी मनमनात दरवळते आहे. नेमक्या याच विचारातून हे काव्य कागदावर उतरलं. लावणी असली तरी एखाद्या आध्यात्मिक काव्याप्रमाणे, भारुडा प्रमाणे तिच्यात एकाच वेळी हे दोन अर्थ रुपकात्मक रित्या मांडता आले. म्हणून हे काव्य मला वेगळं समाधानही देऊन गेलं. थोडक्यात काय तर यातली ‘अप्सरा’ म्हणजे स्वतः लावणीच !!!!

First Published: Wednesday, December 21, 2011, 12:40