Last Updated: Monday, February 27, 2012, 21:42

कवितेच्या उगमाकडे (कहाणी कुसुमाग्रजांची- श्री. शं. सराफ)
गजानन इंग्रजी चौथीत, म्हणजे आताच्या आठवीत शिकत होता. वर्गात मराठीच्या शिक्षकांनी लोकमान्य टिळकांवर निबंध लिहावयास सांगितला. शिक्षकांना निबंध आवडल्याने त्यांनी गजाननची पाठ थोपटली. त्या नशेतच तो घरी आला. समोर नाशिकच्या साप्ताहिक ‘लोकसत्ता’चा अंक दिसला. अंकाच्या पहिल्याच पानावर एक ऑगस्टचा अंक लोक’ान् टिळक विशेषांक निघणार असल्याचा मजकूर होता. त्याच्या मनात कल्पना चमकली. त्याने लगेच एका कागदावर एका दमात टिळकांवर कविता लिहून काढली. उत्साहाच्या भरात तो कागद घेऊन सरळ घराजवळ असलेल्या ‘लोकसत्ता’ कार्यालयात गेला. डाव्या बाजूच्या भव्य दरवाजातून ‘प्रेस’चे दर्शन झाले. कवी आत शिरला, तो उजव्या बाजूस भिंतीलगत एक भव्य शिसवी टेबल दिसले. टेबलामागे टेबलाला शोभणारी खुर्ची होती. टेबलासमोर दोन खुर्च्या. सर्व फर्निचर लाकडाचे व भक्कम होते. मागच्या खुर्चीवर बदामी रंगाचा फेटा बांधलेले, उंचेपुरे वाटणारे गोरेपान गृहस्थ बसले होते. अंगात लांब कोट, कपाळावर गंध. त्या धीरगंभीर पुरुषाला पाहून कवीचे धैर्य पार गळाले. पण आता गुहेत शिरल्यावर पळ काढणे बरे नव्हते. कवी टेबलासमोरच एका खुर्ची’ागे कसाबसा उभा राहिला. तेवढ्यात काहीतरी लिहीत असलेल्या त्या गृहस्थांचे कवीकडे लक्ष गेले. या उमद्या मुलाकडे त्यांनी हसून पाहिले. कवीने हातात पकडून ठेवलेला कवितेचा कागद त्यांच्या हातात दिला. कागद समोर धरून चष्म्यातून ते मजकुरावर नजर फिरवू लागले, ही संधी साधून कवीने झपझप पावले टाकीत रस्ता गाठला. कवी घामाने अक्षरश: निथळत होता. नंतर कवीला समजले, ते सद्गृहस्थ म्हणजे ‘लोकसत्ता’चे संपादक व गावातील एक ज्येष्ठ नेते वैद्यरत्न विष्णुशास्त्री केळकर होते. एवढे विद्वान गृहस्थ आपली कविता छापणार नाहीत ही कवीला खात्री होती. एक ऑगस्ट १९२६ रोजी कवी शाळेतला टिळक पुण्यतिथीचा कार्यक्रम संपवून घरी आला. समोर मासिकाच्या आकारात छापलेला ‘लोकसत्ता’चा ‘लो. टिळक’ अंक होता. त्याने धडधडत्या अंत:करणाने कव्हर उलटले, आत पहिल्या पानावर, वेलबुट्टीत छापलेली कविता दिसली-‘लोकमान्य टिळकांस’. कवितेखाली कवीचे नाव होते. ग.रं. शिरवाडकर. कवीची पहिल्यांदाच लिहिलेली आणि छापून आलेली ही कविता. त्याला खूप आनंद झाला. मात्र या नंतर त्याच्या प्रतिभेने एक झकास ‘पॉज’ घेतला.
शाळेत इंग्रजी पाचवीच्या, म्हणजे आजच्या नववीच्या दोन तुकड्याहोत्या. दुसऱ्या तुकडीतल्या विद्यार्थ्यांनी ‘धूमधडाका’ हस्तलिखित धडाक्याने तयार
केले. तेव्हा त्यांना तडाखा देण्यासाठी गजाननच्या वर्गाने कंबर कसली. साहित्याची आवड असणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी आपले बेतलेले साहित्य ‘शिरवाडकर’च्या ताब्यात दिले. ते फारच कमी होते. मग शिरवाडकरने कथा, संवाद, नाट्यछटा, शब्दचित्र, चरित्र, निबंध सुचेल ते साहित्य लिहून काढले व अंकाला भारदस्तपणा यावा म्हणून त्या वेळच्या पाठ्यपुस्तकातील कवितांची रचनानजरेसमोर ठेवून ‘शिखरिणी’ वृत्तात ‘नारायणराव पेशव्यांचा वध’ ही दीर्घ व प‘ेदार विलापिका तयार केली आणि दुसऱ्या अंकाला तडाखा देण्याइतके बळ कमावले. कुसुमाग्रज - वि.वा. शिरवाडकरांच्या भविष्यकालीन लेखनाची बीजे येथे दिसतात.
दत्तात्रय सखाराम पुरोहित हे तात्यासाहेबांना दोन वर्षे वर्गशिक्षक होते. उंची साडेसहा फूट, शरीरयष्टी पहेलवानी, व्यक्तिमत्त्व ओबडधोबड पण करारी, तपकिरीचा भरपूर प्रसाद कपड्यांनी चाखलेला, पण वाणीवर वाक्देवतेचा वरदहस्त. इंग्रजीचे तास रंगतदार होत, तर इतिहासातील प्रसंग साक्षात डोळ्यांसमोर घडत आहेत असा विद्यार्थ्यांना भास होई. गजानन इंग्रजी सहावीत असताना ते एकदा एका गैरहजर शिक्षकांच्या तासाला वर्गात आले आणि इंग‘जी किंवा इतिहास न शिकविता कविवर्य तांब्यांची ‘हे कोण गे आई’ कविता वाचण्यास त्यांनी सुरुवात केली. ‘नदीच्या शेजारी, गडाच्या खिंडारी’ या प्रारंभीच्या चरणापासून कवितेतील अद्भुत वातावरण असे काही जिवंत केले की सारा वर्ग थरारला. शिरवाडकरच्या अंगावर रोमांच उठले आणि त्याला कवितेच्या उगमाकडे / १९ जाणवले - कविता म्हणजे एखाद्या विषयाचे पद्यरूप नव्हे तर आपल्याला अनुभवाच्या गाभ्यापर्यंत घेऊन जाणारी ती एक अलौकिक शक्ती आहे. थोडक्यात सांगायचे तर-
वेषाने गबाळ | वाणीने मधाळ ॥
ते गुरू पुरोहित | गजानना पावले ॥
या मंतरलेल्या रसग्रहणामुळे कवीच्या प्रतिभेला चेतावणी मिळाली. घरीआल्यावर स्फुरली तशी कविता त्याने लिहून काढली. ही कविता हस्तलिखितासाठी बेतलेल्या कवितेपेक्षा वेगळी होती. आता कवीने वाचनालयातल्या गद्य पुस्तकांकडे दुर्लक्ष केले. तांबे, माधव ज्युलियन,
यशवंत यांचे काव्यसंग‘ह तो वाचू लागला. लवकरच आवडते गडकरी हे कल्पनाप्रभू गोविंदाग्रजही आहेत, हे वर्तमान त्याला कळले. केशवसुत, बालकवी वाचताना तर तो वास्तवाचे भानही विसरला. ‘गोल्डन ट्रेझरी’तून त्याने रोमँटिक युगात वावरणाऱ्या इंग्लिश कवींची ओळख करून घेतली आणि
या तंद्रीत कवीला कविता सुचू लागल्या. पाच-सहा कविता कागदावर उतरविल्यावर त्या प्रसिद्धीसाठी पाठवाव्यात अशी उबळ आली. त्या वेळी मराठीतील सात-आठ मासिकांत, साप्ताहिकांत, पाक्षिकांत कविता छापून येत. कविता पाठवायच्या म्हणजे कवितेवर कवीचे नाव हवे. त्या जमान्यात सुत, अग‘ज, अनुज, रमण अशी जोड देऊनच कवी नाव लावीत. गजाननाचा आदर्श गडकरी. ते ‘गोविंदाग्रज’ तर आपणही असेच नाव
घ्यावे असे कवीला वाटले. आपला सर्वांत धाकटा भाऊ केशव, तेव्हा ‘केशवाग्रज’ नाव योग्य ठरेल. कवीने सुवाच्य अक्षरात एक कविता उतरवून खाली ‘केशवाग‘ज’ (ग.रं. शिरवाडकर) नाव लिहिले, आणि कविता त्या वेळच्या एका वाचकप्रिय मासिकाकडे पाठवून दिली. संपादकांनी टपालखर्च करून ती बू’रँगप्रमाणे कवीकडे पोहोचती केली, तीही ‘साभार’. पण कवी नामोहरम होणारा नव्हता. त्याने तीच कविता वेगळ्याकागदावर लिहून ‘कुसुमाग्रज’ (ग.रं. शिरवाडकर) नावाने दुसऱ्या मासिकाकडे रवाना केली. तेथूनही तिचा प्रवास पुन्हा घरापर्यंत झाला. त्या वेळी केशवरावांचे वय दोन-अडीच वर्षांचे तर कुसुमताईंचे चार-साडेचार वर्षांचे असेल. गजाननने विषाद न मानता एका कवितेवर केशवाग्रज तर दुसऱ्या कवितेवर कुसुमाग‘ज नाव घालून निरनिराळ्या नियतकालिकांना कविता पाठविण्याचा सिलसिला चालू ठेवला, पण एकही संपादक बधेना.
एका सुमुहूर्तावर कवीला ‘खेळायला जाऊ चला’ ही बालकविता स्फुरली. याने ती कुसुमाग्रज (ग.रं. शिरवाडकर) नावाने नाशिकहून प्रसिद्ध होणाऱ्या देवदत्त टिळकांच्या ‘बालबोध मेवा’ मासिकासाठी पाठवून दिली. आणि ‘अहो आश्चर्यम्’! देवदत्तांनी ती कविता सप्टेंबर १९२९ च्या अंकात प्रसिद्ध तर केलीच, पण कवितेचे मानधनही दिले. त्यांनी कवीला भेटायला बोलावले. कवी निसर्गदत्त संकोची स्वभावाने त्यांना भेटायला गेला. देवदत्त रेव्हरंड व लक्ष्मीबाई टिळक या बुजुर्ग दांपत्याचे चिरंजीव. त्यांनी कवीचे कौतुक केले. जवळच्या दोन-तीन इंग्रजी बालकविता व काही तयार ब्लॉक्सचे ठसे कवीला देऊन, त्यांवर कविता करून देण्यास सांगितले. टिळकांनी जानेवारी १९३० च्या अंकात कवीची ‘खेळगडी’ कविता छापताना कंसातले (ग.रं. शिरवाडकर) नाव गाळून टाकले आणि कवीच्या ‘कुसुमाग‘ज’ नावावर संपादकीय मोहोर उमटविली. या नामकरणाच्या ते इतके मोहात पडले की आपल्या मुलांना ते काही दिवस गमतीने अशोकग्रज, मीराग्रज, अशा नावांनी हाक मारीत. आमची मांजर, ओढ्याची गुणगुण, पपी आणि बदक अशा काही कविता कवीने, देवदत्तांनी दिलेल्या भांडवलावर रचल्या. इतरही बालकविता त्यांच्याकडे पाठविल्या. देवदत्तांनी दिलेल्या प्रेमळ आणि दिलखुलास उत्तेजनामुळे, तसेच आकर्षक मानधनामुळेही कवीला बळ मिळाले.
याच काळात नाशिकचे वाडमयप्रेमी वकील गोविंदराव अत्रे यांनी हौसेखातर ‘नवा मनू’ साप्ताहिक सुरू केले. गोविंदराव हे नंतरच्या पिढीतील साहित्यिक प्रभाकर अत्रे यांचे वडील. त्यांनी ‘नवा मनू’त ग.रं.शिरवाडकर या तरुणाचे छोटे लेख छापले. केशवसुतांच्या ‘तुतारी’ आणि ‘नवा शिपाई’ कवितांची आठवण करून देणारी ‘संक‘मण’ ही कविताही प्रसिद्ध केली. त्यामुळे जगाला नाही तरी नाशिकच्या साहित्यप्रेमींना कुसुमाग‘ज (ग.रं. शिरवाडकर) हे कवी-लेखक आपल्या गावात आहेत हे लक्षात आले. गजानन त्या वेळी नाशिकच्या हं.प्रा.ठा. महाविद्यालयात प्रथम वर्गात शिकत होता. महाविद्यालयाचे उपप्राचार्य भा.ल. पाटणकर हे, कवी अनंततनय यांनी स्थापन केलेल्या वायविहार मंडळाचे चिटणीस होते. त्यांनी १९ जानेवारी १९३० रोजी ‘माधवी’ हा मंडळाचा कवितांचा संपादित संग्रह प्रसिद्ध केला. त्यासाठी आपल्या शिरवाडकर विद्यार्थ्याकडून दोन कविता मागून घेतल्या. त्या कविता ‘कृष्णकरी चंद्र’ आणि ‘मनोरमा’. या कविता पुढे आपल्या कोणत्याही संग्रहासाठी निवडल्या नसल्या तरी गजाननच्या मनोविश्वात त्यांना मोलाचे स्थान आहे.
कृष्णकरीं चंद्र
(चाल : डोळे हे जुलमि गडे-)
‘‘सोड स‘या मार्ग झणीं चंद्र उभा डोईवरी’’
‘‘डोईवरी? छे ग सखे, चंद्र उभा कृष्णकरीं’’
‘‘बोल तुझे कांहिंतरी
अर्थ न त्या तीळभरी
कृष्णकरीं चंद्र कसा नवल मला गे बाई’’
‘‘नवल कसें हें बघ तें’’ कृष्ण मुखा करिं घेई.
‘‘सोड सख्या रात्र किती वेळ पहा, जात फुका’’
सप्तमिच्या चंद्रकरीं काव्य घडें हें रसिका.
कवितेच्या प्रारंभी (चाल : डोळे हे जुलमि गडे-) असा उल्लेख आहे. त्यावरून कवी नवखे आहेत हे जाणवते. या कवितेतील शेवटची ओळ सोडली तर इतर ओळी हा सखा व सखी यांच्यातील प्रणयसंवाद आहे. प्रेमिक सखीला ‘चंद्र डोक्यावर नसून त्याच्या हातात आहे’ असे सांगतो तेव्हा तिला कोडे पडते. पण तो आपल्या ओंजळीत तिचे मुख घेऊन कोड्याची उकल करतो. ही कल्पना त्या वयाला साजेशीच आहे.
सुटीत तात्यासाहेब पिंपळगावला असले की रात्री चांदण्यात फिरण्याचा कार्यक्रम असे.बरोबर गोदूबाई, मनोहर, कुसुम आदी भावंडे आणि रावसाहेब- पिंपळगावला असतील तर ते असत. तात्यासाहेब व गोदूबाई दोघे एकत्र असे कधीही फिरले नाहीत. ही कविता लिहिली तेव्हा तात्यासाहेबांचे वय अठरा व
गोदूबाईंचे पंचवीस होते. कविता काल्पनिक असली तरी चांदण्यातील फिरण्यावरून ती सुचली हे सहज लक्षात येते.
‘मनोरमा’ कवितेत आदर्श सखीचे व्यक्तिचित्र रेखाटले आहे. ‘ती सुखदा आहे, शुभदा आहे,’. कवितेत कवीने अशी अपेक्षा व्यक्त केली आहे की, ‘संसारात अनंत अडचणी आणि जीवघेणी संकटे येतात, स्वप्ने ढासळतात, स्वार्थी माणसे भेडसावतात, अशा वेळी ‘मनोरमे’ने साथ देऊन संकटांच्या अंधारावर मायेने चांदणे पसरावे आणि जीवनात चैतन्य चेतवावे’. या कवितेतील ‘मनोरमा’ म्हणजे गोदूबाई नव्हेत आणि लग्नात गजाननने गंगूबाईचे नाव मनोरमा ठेवले असले तरी त्याही नव्हेत. केवळ कवीचे स्वप्न या कवितेत उतरले आहे. मात्र गोदूबाई व गंगूबाईंची प्रेरणा स्वप्नामागे असू शकेल.
‘प्रतिभा’ पाक्षिकात १६ फेब‘ुवारी १९३४ मध्ये प्रसिद्ध झालेली ‘हिंडता वैराण रानी’ आणि १४ सप्टेंबर १९३४ अंकात ‘मग समाधान मिळणार कुठे?’ या दोन कविता कोणत्याही संग्रहात नसल्या तरी कवीने साक्षेपाने जपून ठेवल्या होत्या. ‘आयुष्याच्या वैराण रानात वणवण करावी लागत असताना प्रेयसीचे संगीत आणि सहवासच आपल्याला तारून नेईल’, अशी अपेक्षा ‘हिंडता वैराण रानी’ कवितेत व्यक्त केली आहे. तर ‘मग समाधान मिळणार
कुठे?’ कवितेत ‘जीवनात चहूबाजूला काटेअंथरले असताना, उरात धगधगीत निखारा पेटला असताना समाधान मिळणार तरी कसे?’ अशी खंत व्यक्त झाली आहे. माईंच्या अकाली वदु:खद निधनामुळे दादा शिरवाडकरांची मन:स्थिती व परिस्थिती खालावत होती तरी तात्यासाहेबांचे कॉलेज शिक्षण पूर्ण होईपर्यंत कुटुंबावर जाणवण्याइतका परिणाम झाला नव्हता. मग ‘मनोरमा’, ‘हिंडता वैराण रानी’, ‘मग समाधान मिळणार कुठे?’ या कवितांत निराशेचे सूर का? हा मराठीतील व इंग‘जीतील आवडत्या कवींच्या कवितांचा परिणाम असावा.
प्रथमावस्थेत लिहिलेल्या आणि ‘श्री महाराष्ट्र शारदा, भाग-२’ या संग‘हात व काही अग्रेसर मासिकांत व अन्यत्र प्रकाशित झालेल्या किमान दीडशे कविता कवीने आपल्या संग्रहात तर घातल्या नाहीतच,पण जवळही ठेवल्या नाहीत. मात्र आता यांतील ज्या कविता उपलब्ध झाल्या त्यांतून कवीच्या भविष्याची चाहूल लागते.
कवितेच्या वनात कविराज हिंडत असताना त्यांना घर सापडायला अर्धतप ओलांडावे लागले. १९३६ मध्ये ‘ज्योत्स्ना’ मासिकात ‘स्वप्नाची समाप्ती’ कविता प्रसिद्ध झाली आणि या कवितेने मराठीत एका कविश्रेष्ठाला जन्म दिला.
***
First Published: Monday, February 27, 2012, 21:42