Last Updated: Friday, December 21, 2012, 21:35
www.24taas.com, मुंबई सलमान खानचा दबंग २ बॉक्स ऑफिसवर धडकलाय. या सिनेमात सलमान खान, सोनाक्षी सिन्हा, विनोद खन्ना, प्रकाश राज हे मुख्य भूमिकेत आहेत.
‘दबंग २’ तिथून सुरू होते जिथं ‘दबंग’ (पहिला भाग) संपतो. चुलबूल पांडे मात्र तोच, पोलिसाच्या खाक्या पोशाखातला आणि कॉलरच्या मागे गॉगल लावून शिट्या मारत फिरणारा. आता इथं चुलबुल पांडे एका विवाहित पुरुष आहे आणि त्यानं आपला संसार ‘लालगंज’ऐवजी कानपूरमध्ये थाटलाय. चुलबूल इथं बजरियाचा ठाणेदार बनलाय. खलनायकाच्या नावात बदल होऊन छेदी सिंगऐवजी बच्चा सिंग झालंय. बस एवढाच फरक ‘दबंग’ आणि ‘दबंग टू’मध्ये आहे. बाकी कलाकारांच्या रंगाढंगात तुम्हाला काही फरक जाणवणार नाही. तसंच या सिनेमातील गाण्यांनी दबंगची आठवण करून दिली असं म्हटलं तरी चालेल. अरबाज खानचं काम त्यामुळे खूपच सोप झालं होतं, असं म्हणता येईल. कोरिओग्राफर्सनं आयटम साँग जबरदस्त चित्रीत केलंय.
हा सिनेमा तुम्हाला बोअर वाटणार नाही पण, ‘दबंग’ पेक्षा खासही वाटणार नाही. सिनेमाला हलकी-फुलकी ट्रीटमेन्ट दिली गेलीय. अॅक्शनला थोड्या सीमा आल्यात. वडील-मुलगा, पती-पत्नी मधली गोड भांडणं थोडी वाढवण्यात आलीत. विनोद खन्ना आणि सलमान खानचा मध्यरात्री घराच्या छतावर एक सीन चित्रीत करण्यात आलाय. तोही मस्त झालाय.
छेदी सिंहला लालगंजमध्ये ठार केल्यानंतर चुलबूल पांडेची कानपूरमध्ये बदली होते. तो तिथं पोहचण्याच्या आधीच त्याच्या बहादुरीच्या कथा तिथं पोहचतात आणि त्यांवर चर्चाही सुरू होते. कानपूरमध्ये पोहचल्यानंतर चुलबूलचा पहिला सामना होतो तो प्रकाश राजबरोबर... आणि इथूनच सुरू होतो चोर पोलीसचा खेळ... प्रकाश राज एक नेत्याच्या भूमिकेत आहे. त्यानं ही भूमिका चांगलीच वठवलीय.
सिनेमात कॉमेडीची खिचडी चांगलीच जमलीय. खाक्या पोशाखातले पोलिसही नाचताना दाखवले गेलेत. सोनाक्षी सिन्हा पहिल्या सिनेमापेक्षा चांगलीच सशक्त दिसतेय. तिचा अभिनयही उठावदार आहे. सिनेमातील दोन गाणी तर सिनेमा रिलीज होण्याअगोदरच हिट झालेत.
First Published: Friday, December 21, 2012, 21:35