`ट्रॅजडी किंग` नव्हे तो ठरलाय `नव्वदीचा पती परमेश्वर...`, happy birthday dilip kumar, completed 90 years

`ट्रॅजडी किंग` ठरलाय `नव्वदीचा पती परमेश्वर...`

`ट्रॅजडी किंग` ठरलाय `नव्वदीचा पती परमेश्वर...`
www.24taas.com, मुंबई

बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार आणि अभिनयाचं प्रतिक समजल्या जाणाऱ्या दिलीप कुमार (खरं नाव मोहम्मद युसूफ खान) यांचा आज वाढदिवस... दिलीप कुमार यांनी आज वयाची नव्वद वर्ष पूर्ण केलीत. यानिमित्तानं त्यांनी एका छोटेखानी पार्टीचंदेखील आयोजन केलंय.

जन्मदिवसाच्या पूर्वसंध्येला दिलीप कुमार आणि त्यांची पत्नी अभिनेत्री सायरा बानो यांनी आपल्या जीवनातील अनेक आठवणींना वाट मोकळी करून दिली. ‘यावर्षी आम्ही आमच्या अनेक मित्रांना मुकलोय. त्यामुळे हे वर्ष तर शोकाकूळ वातावरणातच गेलंय. त्यामुळे आम्ही या पार्टीसाठी केवळ खूप जवळच्या मित्रांनाच आमंत्रित केलंय’ असं सायरा यांनी म्हटलंय. दिलीप कुमार यांचा परिवाराचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री ए. के. पी. साल्वे तसंच निर्माते यश चोपडा, राजेश खन्ना, दारासिंह या सर्व दिवंगत दिग्गजांच्या खूपच जवळचे संबंध होते.

‘मी केवळ १२ वर्षांची असल्यापासून दिलीप कुमार यांच्या प्रेमात पडले होते. त्यांच्या प्रेमाशिवाय मला काही दिसतच नव्हतं. खाजगी जिवनात ते खुपच प्रेमळ आणि सभ्य आहेत. दिलीप कुमार यांनी मला ज्यादिवशी प्रपोज केलं तो क्षण माझ्यासाठी केवळ अविस्मरणीय आहे. दोघांच्या वयामध्ये तब्बल २२ वर्षांचं अंतर असूनदेखील आयुष्यभर आम्ही एकमेकांसाठी मजबूत आधार बनून राहिलो आहोत. मी त्यांना पती परमेश्वरच मानते. मनाने मी नेहमीच परंपरावादी स्त्री राहिलेय. आत्ताही दिलीप कुमार हेच माझ्यासाठी सर्वकाही आहेत’ असं सायरा बानो यांनी यावेळी म्हटलंय.

दिलीप कुमार यांनी १९४४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ज्वार भाटा’ सिनेमातून हिंदी सिनेसृष्टीत पहिलं पाऊल टाकलं होतं. यानंतर त्यांनी मधुमती, शहीद, देवदास, अंदाज, मुगल-आझम, राम और श्याम, कर्मा, सौदागर असे अनेक सिनेमांतून आपलं अभिनव कौशल्याची छाप बॉलिवूडवर पाडली. अंदाज, बाबूल, मेला, दिदार, जोगन यांसारख्या सिनेमांतून प्रेमात विफल झालेल्या प्रियकराची अविस्मरणीय भूमिका उठवल्यानंतर त्यांना ‘ट्रॅजडी किंग’ नावानं संबोधित केलं जाऊ लागलं. १९९८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘किला’ या सिनेमानंतर मात्र त्यांनी चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला.

First Published: Tuesday, December 11, 2012, 12:35


comments powered by Disqus