Last Updated: Thursday, February 21, 2013, 08:58
www.24taas.com, मुंबई चेतन भगत लिखित ‘थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ’ या पुस्तकावर आधारित ‘काय पो छे’ लवकरच पडद्यावर झळकण्याच्या मार्गावर आहे. अभिनेता ऋतिक रोशनला मात्र प्रदर्शनाआधीच हा सिनेमा पाहण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर आता तो या सिनेमाचं न थकता कौतुक करतोय.
सिनेमाचा दिग्दर्शक अभिषेक कपूर यांनी नुकतंच या सिनेमाचं एक स्पेशल स्क्रिनिंग आयोजित केलं होतं. यासाठी त्याचा मित्र आणि अभिनेता ऋतिक रोशन उपस्थित राहिला. हा सिनेमा पाहून झाल्यानंतर त्याला तो इतका आवडला की त्यानं अगदी तोंडभरून या सिनेमाचं कौतुक केलंय.
‘कमालीचा सिनेमा आहे हा... मला आशा आहे की, हा सिनेमा बॉक्सऑफिसवर धम्माल उडवून देईल... कारण, खरंच असे सिनेमे चालायला हवेत. यातील प्रत्येक कलाकारानं कमालीचा अभिनय केलाय. त्यांचा अभिनय सरळसरळ तुमच्या हृदयाला साद घालतो…’ असं म्हणत ऋतिकनं यातील नवोदित कलाकारांना दाद दिलीय.
सिनेमाच्या टीमचं अभिनंदन करताना ऋतिक म्हणतो, ‘यातील कलाकारांनी खूपच चांगलं काम केलंय आणि माझ्या मते त्यांनी पहिल्यांदाच सिनेमात काम केलंय. मला या सिनेमाचं, अभिषेक आणि त्याच्या संपूर्ण टीमचा अभिमान वाटतोय. यातील कलाकार खूप पुढे जाऊ शकतात, असं मला वाटतंय’.
‘काय पो छे’ २२ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये सुशांत सिंह राजपूत, अमित साध आणि राज कुमार यादव यांनी प्रमुख भूमिका निभावल्यात.
First Published: Thursday, February 21, 2013, 08:45