इसक् : प्रतिक-अमायराची धम्माल जोडी!, `Issaq` review

इसक् : प्रतिक-अमायराची धम्माल जोडी!

इसक् : प्रतिक-अमायराची धम्माल जोडी!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

दिग्दर्शक : मनीष तिवारी
निर्माता : धवल गाडा, शैलेष सिंह
कलाकार : प्रतिक बब्बर, अमायरा दस्तूर, रवी किशन, राजेश्वरी सचदेव, प्रशांत नारायण


अमीत तिवारी यांचा इसक हा चित्रपट शेक्सपीअरच्या ‘रोमियो ज्युलियट’ या कथेवर रचला गेलाय. दोन कुटुंबांमध्ये असलेला वाद, व्यापारावरून झालेला वाद आणि दक्षिण भारतीय नक्षल नेत्याच्या नेतृत्वाखाली झालेलं आंदोलन या सगळ्या पार्श्वभूमीवर ‘इसक’ची कथा पुढे सरकत राहते. काही दृश्यांमुळे हा रोमांटिक सिनेमाही वाटतो पण तेवढ्यापुरताच.

काय आहे कथानक
राजकारण, कायद्याला न जुमानणाऱ्या आणि गुन्हेगारीत बुडालेल्या एका टोळीशी आणि पोलिसांची ही एक कथा.... प्रेम, वासना, मैत्री, विश्वासघात तसंच आपलं वर्चस्व कायम राहावं ही इच्छा अशा अनेक गोष्टी सिनेमात भरपूर भरल्यात. बनारसमधले दोन वाळू माफिया कश्यप आणि मिश्र यांचा एकमेकांना शह देण्याचा प्रयत्न... त्यातच सहभागी आहेत मंत्री, पोलीस आणि ‘लाल सलाम’चा नारा ठोकणारे काही नक्षलवादी… आणि या पार्श्वभूमीवर मिश्रचा मुलगा राहुल आणि कश्यपची मुलगी यांच्यात निर्माण होतो प्रेमबंध... आणि सिनेमाचं कथानक पुढे सरकत राहतं...

नवखे अमायरा आणि प्रतिक
मिश्रचा मुलाच्या म्हणजेच राहुलच्या भूमिकेत दिसतो स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतिक बब्बर तर कश्यपच्या मुलीच्या 'बच्ची'ची भूमिका निभावलीय नवख्या अमायरा दस्तूर हिनं...

प्रतिकनं आपली भूमिका खूप चांगल्या पद्धतीनं आत्मसात केलेली पहिल्यांदाच या सिनेमात दिसते. अमायरानंही आपल्या भूमिकेला न्याय दिल्यासारखा वाटतो. तिचा निरागसपणा सिनेमातूनही दिसतो. प्रतिक आणि अमायराची जोडीही चांगलीच जमलीय. रवी किशन नेहमीप्रमाणेच आपला प्रभाव दाखवून देतो. पण, राजेश्वर सचदेव हिनं रंगवलेली सावत्र आई मात्र भाव खाऊन जाते.

खूप दिवसानंतर या सिनेमातून नीना गुप्ताही दिसणार आहे. बाबाच्या भूमिकेत मकरंद देशपांडेही दिसतो.

प्रेक्षकांची निराशा
कथा, कथेतील पात्रांची आणि घटनांच्या जुळवाजुळवीचा प्रयत्न चांगला असला तरी सिनेमा उगाचच खेचल्यासारखा वाटतो... आणि लांबलचक ‘इसक’ प्रेक्षकांना कंटाळवाणा वाटू लागतो. शेवटी शेवटी तर प्रेक्षक सिनेमा सोडून मधूनच थिएटरबाहेर निघून जातील की काय? असा प्रश्न पडण्याइतपत कंटाळवाणा वाटतो.

सिनेमातलं संगीत
सिनेमातली गाणी चांगलीच जमलीत. सिनेमाच्या कथानकाला साथ देणाऱ्या गाण्यांचा चांगल्या पद्धतीनं वापर करण्यात आलाय. बनारसचा मूड आणि रंग ढंग गाण्यांतून उठावदार पद्धतीनं प्रेक्षकांसमोर येतात.


शेवटी काय तर काही एकदा तरी नक्कीच तुम्ही हा चित्रपट पाहू शकता... प्रतिक बब्बर आणि अमायराही तुम्हाला चित्रपटात गुंतवून ठेवतात.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, July 28, 2013, 14:08


comments powered by Disqus