काजोलला `जब तक...`च्या प्रिमिअरचं आमंत्रणच नाही! Jab tak Hai Jaan` premiere: Kajol not invited

काजोलला `जब तक...`च्या प्रिमिअरचं आमंत्रणच नाही!

काजोलला `जब तक...`च्या प्रिमिअरचं आमंत्रणच नाही!
www.24taas.com, मुंबई

जिथं सगळी फिल्मइंडस्ट्री ‘जब तक है जान’च्या प्रिमिअरसाठी अवतरली होती, तिथं यश चोप्रा यांच्या आत्तापर्यंतच्या सिनेमातील जवळजवळ सगळ्याच तारका उपस्थित होत्या. मात्र, या सगळ्या गर्दीमध्ये एक चेहरा मात्र प्रत्येकजण शोधण्याचा प्रयत्न करत होता. पण, तो चेहरा मात्र तिथं उपस्थित नव्हताच.

हा चेहरा होता ‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’मध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचा आणि अजय देवगण याच्या पत्नीचा... काजोलचा. अजय देवगण आणि यश राज फिल्म्सनं एकमेकांवर घेतलेल्या कायदेशीर भूमिकेमुळे काजोल हिला या प्रिमिअरसाठी निमंत्रणच दिलं गेलं नव्हतं.

याचा धक्का अर्थातच, बॉलिवूड मंडळी, काजोलचे चाहते यांच्यासोबतच काजोलची बहिण तनिशा हिलाही बसलाय. ती ट्विटरवर यश राज फिल्मचा आणि संबंधित मंडळींचा जाहीर निषेध केलाय. तनिशा म्हणते, ‘काजोल ही दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे या सिनेमाची आघाडीची अभिनेत्री आहे. रानी मुखर्जी, शाहरुख खान, यशजींचं कुटंब – उदय आणि आदित्य चोप्रा यांनी केलेल्या या कृतीचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत.’

दरम्यान, याअगोदर कित्येकदा ‘सन ऑफ सरदार’ला जाहीर पाठिंबा देणाऱ्या सलमाननं मात्र यावेळी ट्विटरवर ‘जब तक है जान’चीच स्तुती केलीय. कदाचित आपली चांगली मैत्रिण कतरिनाला प्रोत्साहन देण्याचा त्याचा हा प्रयत्न असेल. सलमान या अगोदर यश राज फिल्मनिर्मित ‘एक था टायगर’ चित्रपटात दिसला होता.

‘जब तक है जान’ च्या प्रिमिअरनिमित्त तीनही खान (सलमान, शाहरुख, आमीर) एकत्र दिसले. तसंच या प्रिमिअरसाठी माधुरी दीक्षित, श्रीदेवी, ऐश्वर्या, रेखा यांसहित अनेक आघाडीच्या तारका उपस्थित होत्या.

First Published: Tuesday, November 13, 2012, 21:11


comments powered by Disqus