Last Updated: Saturday, February 23, 2013, 09:02
www.24taas.com, मुंबई
बॉलिवूडमध्ये मैत्रीवर आणि मित्रांवर अनेक सिनेमे बनवले गेलेत. पण, एकाच वेळेस मनोरंजन आणि संवेदनशीलतेच्या बाबतीत फारच थोड्या सिनेमांना प्रेक्षकांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. कदाचित तीच कमतरता भरून काढायचा प्रयत्न ‘काय पो छे...’मधून होताना दिसतोय. ही कथा आहे मैत्रीची आणि त्याचसोबत महत्त्वकांक्षेचीही... कधी खळखळून हसवणारी तर कधी रडायला भाग पाडणारी... ज्यांनी चेतन भगत लिखित ‘थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ’ ही कादंबरी वाचलीय त्यांच्यासाठी ही कथा नवीन नक्कीच नसेल पण ती कथा पडद्यावर पाहण्याचा अनुभव निश्चितच वेगळा ठरेल. दिग्दर्शन : अभिषेक कपूर (रॉक ऑन फेम)
कथा : चेतन भगत
प्रमुख कलाकार : सुशांत सिंह राजपूत, अमित साध, राजकुमार यादव
‘काय पो छे’ ‘काय पो छे’... सिनेमाचं नाव गुजरातीत आहे. कथाचं गुजरातमधल्या अहमदाबादवर बेतलं असल्यानं या सिनेमाचं नावही स्थानिक भाषेतच ठेवलं गेलंय.
दमदार कथा... सिनेमाचं कथानक थोडं वेगळं असलं तरी ते आपल्याचं आजुबाजुला घडणाऱ्या घटनांवर बेतलेलं आहे. बऱ्याचदा एखाद्या घटनेचं खरं खरं रुप पाहायला मिळतंय की काय अशी शंकाही येते. सिनेमाचं कथानक अनेकदा नवं वळण घेतं. कधी मित्रांची धम्माल-मस्ती पाहायला मिळते तर कधी हीच मैत्री राजकारण आणि धर्मकारणाच्या लाटांमध्ये हेलकावे खाताना दिसते. सिनेमात एखादा सामान्य माणूनही दिसतो, क्रिकेटसाठीची तरुणांची क्रेझही आणि सत्तेसाठी अनेकदा दिसून येणारं वेडही... आपल्याच समाजाशी निगडीत अशा बऱ्याचसे क्षण आपल्या डोळ्यांसमोर उभे राहतात.
चेतन भगतसाठी खूप खास चेतन भगत लिखित ‘थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ’ ही कादंबरी गेल्या काही काळात खूपच गाजली होती. या कादंबरीवर हा आधारित हा सिनेमा आहे. त्यामुळे नक्कीच चेतनलाही या सिनेमातून आपली कादंबरी दृश्यंरुपात साकार होताना वेगळा अनुभव येतोय. पण, हा सिनेमा त्याच्यासाठी आणखी खास ठरलाय कारण, त्याचा ८ वर्षांचा मुलगा ईशान भगत हा बालकलाकाराच्या भूमिकेत या सिनेमातून पहिल्यांदाच पडद्यावर झळकणार आहे.
तीन मित्रांच्या मैत्रीची कथा… ईशान, ओमी आणि गोविंद... गुजरातमधल्या अहमदाबादचे हे तिघे रहिवासी आणि ‘सख्खे’ मित्र... या तरुणांच्या डोळ्यातही स्वप्नं आहेत... आणि काही महत्त्वकांक्षा... त्या त्यांना पूर्णही करायच्यात. गरिबीतून मार्ग काढत शिक्षण पूर्ण करणाऱ्या गोविंदचं स्वप्न आहे स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा. ईशान क्रिकेट वेडा, तर ओमी कदाचित आपली स्वप्नं धुंडाळणारा... तिघांचा रस्ता एकाच चौकात येऊन मिळतो तो म्हणजे ‘क्रिकेट’... आणि मग सुरु होतं, क्रिकेटशी संबंधित वस्तूंचं आणि क्रिकेटचं ट्रेनिंग देण्याचा ‘बिझनेस’. पण, तिघांच्या जीवनाची ध्येय मात्र वेगळी ठरतात.
अली नावाच्या एका लहानग्या खेळाडूमध्ये ईशान आपलं स्वप्नं बघतो. त्याला क्रिकेटचं ट्रेनिंगची जबाबदारी ईशान आपल्या खांद्यावर घेतो आणि ईशानला त्यात आपलंही ध्येय दिसतं. ओमीला मात्र आपल्या मित्रांची सोबत हवीहवीशी वाटतेय. त्यामुळे तो त्यांच्यासोबतच... कोणत्याही ठाम मताशिवाय. पण, मग आजुबाजुच्या घटनांमध्ये बदल होतो आणि त्याचे पडसाद या तिघांच्या जीवनावरही उमटतात... वेगवेगळे.
नवोदित कलाकरांची दमदार एन्ट्री आपला बॉलिवूड पदार्पणाचा श्रीगणेशा करणाऱ्या सुशांत सिंह राजपूतनं पहिल्या दणक्यातच जोरदार परफॉर्मन्स दिलाय. सुशांत हा मूळचा बिहारचा. त्यानं या सिनेमात ईशानची भूमिका निभावलीय. अमित साध यानंही ओमीची भूमिका जिवंत ठेवलीय. तर राजकुमार यादवनंही आपण इतरांपेक्षा कमी नसल्याचं दाखवून दिलंय.
बघायला हवा का? होय... नक्कीच. प्रेक्षकांच्या मनापर्यंत धडक मारण्याच्या उद्देशानंच आलेला हा सिनेमा आपली महत्त्वकांक्षा नक्की पूर्ण करणार असंच दिसतंय. उत्तम कथानक आणि उत्तम दिग्दर्शनाचा संगम या सिनेमात तुम्हाला पाहायला मिळेल. सिनेमा बघताना नकळत आपल्या जीवनाशी निगडीत असलेल्या अनेक गोष्टींचा ताळमेळ आपण या गोष्टींशी जोडून पाहतो. सत्यघटना पाहण्यास आवडणाऱ्या लोकांपर्यंत ही कथा मोठ्या ताकदीनं पोहचेल, अशी आशा आहे.
First Published: Saturday, February 23, 2013, 08:58