वन्स अपॉन टाईम इन मुंबई दोबारा : रिव्हयू, review : once upon a time in mumbai dobara

रिव्हयू : वन्स अपॉन टाईम इन मुंबई दोबारा

 रिव्हयू : वन्स अपॉन टाईम इन मुंबई दोबारा
www.24taas.com झी मीडिया, मुंबई

एकता कपूर निर्मित ‘वन्स अपॉन ए टाईम इन मुंबई दोबारा’ आज प्रदर्शित झाला. हा सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित न होता आज प्रदर्शित झाला आहे. अनेक जण या सिनेमाची वाट पाहत होतो पण अक्षय कुमारच्या चाहत्यांना तो कोणत्या भुमिकेत आहे हे पाहण्याची आधिकच उत्सुकता होती.
‘वन्स अपॉन ए टाईम ईन मुंबई दोबारा’ हा २०१० मधील आलेला ‘वन्स अपॉन ए टाईम इन मुंबई’ या सिनेमाचा सिक्वल आहे. पहिल्या भागात अजय देवगण, इमरान हाश्मी आणि कंगना राणावत यांनी मुख्य भूमिका केली होती. पण या सिक्वलमध्ये अक्षय कुमार, इमरान खान आणि सोनाक्षी सिन्हा हे प्रमुख भुमिकेत आहेत.
या सिनेमाच्या गाण्यामुळे लोकांची उत्सुकता अधिक वाढली होती. मात्र पहिल्या सिनेमासारखी कोणतीच गोष्ट या सिनेमामध्ये नाही. या सिनेमात एक डॉन आणि त्याच्या प्रेमिकाची कहाणी दाखवली आहे. अक्षय कुमारच्या अॅक्टिंगच या चित्रपटाचा प्लस पॉईंट आहे.
वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई सिनेमात इमरान हाश्मीने साकारलेला शोएब या भागात अक्षय कुमारने साकारला आहे. संपूर्ण मुंबईवर राज्य करण्याची शोएबला इच्छा आहे. या दरम्यान त्याची भेट होते जस्मिनशी म्हणजेच सोनाक्षी सिन्हाशी आणि एक नवी प्रेम कहाणी सुरू होते.

यानंतर या सिनेमात शोएबच्या विश्वासातला व्यक्ती असणाऱ्या अस्लमचा (इमरान खान) प्रवेश होतो. जस्मीनवरच्या प्रेमामुळे तो शोयेबलाही धोका देतो. शोएब, जस्मिन आणि अस्लम यांच्यातील प्रेमाचा त्रिकोण या सिनेमात दाखवला आहे.

सिनेमाचं संवाद लेखन करणाऱ्या रजत आरोरला लिखाणाचे पैकीच्या पैकी मार्क. हमखास टाळ्या आणि शिट्ट्या मिळणारे संवाद या सिनेमात आहेत. विशेषतः अक्षय कुमारने संवाद म्हणताना त्यात धमाल आणली आहे. मात्र या व्यतिरिक्त सिनेमाची कथा मात्र तितकीशी सशक्त नाही. सुरूवातीपासूनच पुढे काय घडणार आहे, याचा अंदाज येऊ लागतो.

अभिनयाच्या बाबतीत हा सिनेमा पूर्णपणे अक्षय कुमारचाच ठरला आहे. शोएबची व्यक्तिरेखा साकारताना अक्षयने आपला सर्व अभिनय पणाला लावला आहे. अक्षयने आपण व्हर्सटाईल अभिनेता असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. इमरान खानने नव्या रूपात प्रेक्षकांना जिंकण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला अशा भूमिकेमध्ये पाहाताना चांगलं वाटत असलं, तरीही त्याच्याकडून अजून चांगल्या अभिनयाची अपेक्षा आहे. अभिनेत्री बनू इच्छिणाऱ्या जस्मिन या काश्मिरी मुलीच्या भूमिकेत सोनाक्षी सिन्हा सुंदर दिसली आहे. मिळालेल्या भूमिकेला सोनाक्षीने पूर्ण न्याय दिला आहे.

७० च्या दशकातील सिनेमांची आठवण यावी, अशा स्वरूपाचं दिग्दर्शन करण्यात दिग्दर्शक मिलन लुथरिया नेहमीच यशस्वी ठरला आहे. या सिनेमातही सत्तरच्या दशकातील सिनेमांची प्रकर्षाने आठवण व्हावी, असे काही प्रसंग मिलनने निर्माण केले आहेत. ते पाहातानाही चांगले वाटतात.

संगीताच्या आघाडीवर ‘ये तुने क्या किया’ हे गाणं आणि ‘अमर अकबर अँथोली सिनेमा’तील ‘तय्यब अली’ ही गाणी श्रवणीय आहेत. इतर गाणीही चांगली आहेत. मात्र सिनेमाच्या कथेत ती अडथळा निर्माण केल्यासारखी वाटतात. या गाण्यांमुळे सिनेमाचा वेग मंदावतो.

आधीच्या `वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई` या सिनेमाच्या तुलनेत दुसऱ्या भागाचा प्रभाव फारच कमी पडतो. या सिनेमात केवळ अक्षय कुमारचा अभिनय ही एकमेव जमेची बाजू ठरली आहे. सिनेमानंतरही तोच लक्षात राहातो.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.


* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, August 15, 2013, 19:04


comments powered by Disqus