Last Updated: Tuesday, March 19, 2013, 14:29
www.24taas.com, मुंबई मनोज कुमार... बॉलिवूड दिग्गजांपैकी एक अभिनेता. मनोज कुमार यांचा शांत स्वभाव सर्वांच्याच परिचयाचा. पण, आता मात्र ते शांत होण्याच्या मन: स्थितीत नाहीत. आता मात्र आपण ‘ओम शांती ओम’च्या निर्मात्यांना सहजासहजी सोडणार नाही, असा निश्चय मनोज कुमार यांनी केलाय.
शाहरुख खान, अर्जुन रामपाल आणि दीपिका पदुकोन यांचा ‘ओम शांती ओम’ नुकताच जपानमध्ये प्रदर्शित झालाय. पण, जपानमध्ये दाखवल्या जाणाऱ्या या सिनेमाच्या प्रिंटमधून मनोज कुमार यांचा उल्लेख असणारा भाग न हटविताच तो प्रदर्शित करण्यात आलाय. त्यामुळे मनोज कुमार भयंकर चिडलेत. या सिनेमाच्या निर्मात्यांवर आता आपण १०० करोडोंचा दावाच ठोकणार असल्याचं मनोज कुमार यांनी जाहीर केलंय.
२००७ साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमामध्ये मनोज कुमार यांच्या नावाचा उल्लेख करून कॉमेडी निर्माण करण्याचा निर्मात्यांचा प्रयत्न होता. पण, मनोज कुमार यांनी निर्मात्याच्या या प्रयत्नाला खो घातला होता. हे प्रकरण न्यायालयात पोहचल्यानंतर सिनेमातून हे दृश्यं काढून टाकण्यात येईल, असं सांगितल्यानंतर हा वाद मिटला होता.
‘त्यांनी माझा एकदा नाही तर दोन वेळा अनादर केलाय. तसंच त्यांनी यावेळी कोर्टाचादेखील अनादर केलाय. कारण या सिनेमाच्या प्रत्येक प्रिंटमधून आणि ब्रॉडकास्ट मटेरिअलमधून ही दृश्यं हटवण्यात यावीत, असं कोर्टानं म्हटलं होतं. मागच्या वेळी मी त्यांना माफ केलं होतं पण या वेळेस मात्र मी त्यांना सोडणार नाही’ असं मनोज कुमार यांनी म्हटलंय. आपल्या शांत स्वभावाचा इतर लोक गैरफायदा घेत असल्याचं मनोज कुमार यांनी म्हटलंय.
First Published: Tuesday, March 19, 2013, 14:29