Last Updated: Wednesday, January 23, 2013, 16:39
“माय नेम इज खान, अँड आय ऍम नॉट अ टेररिस्ट” असं म्हणत मुस्लिम धर्मियांच्या भावना शाहरुख खानने काही वर्षांपूर्वी ‘माय नेम इज खान’ सिनेमात मांडल्या होत्या. एका नियतकालिकाशी बोलताना शाहरुखने पुन्हा एकदा या विषयावर आपलं मत मांडलं आहे. ९/११च्या घटनेनंतर मुस्लिम म्हणून शाहरुखला काय वाटतं, ते त्याने व्यक्त केलं.
न्यू यॉर्क टाइम्स या आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रामध्ये आलेल्या लेखात शाहरुखने आपण मुस्लिम असल्यामुळे राजकारण्यांसाठी अनोळखी वस्तू बनलो असल्याची भावना व्यक्त केली आहे. ४७ वर्षीय शाहरुख खानने असं म्हटलं आहे, की कधी कधी मी राजकारण्यांच्या हातची अनोळखी वस्तू बनतो. काही राजकारणी स्वतःच्या फायद्यासाठी भारतीय मुस्लिमांच्या देशद्रोहाचं आणि चुकीचं असल्याचं प्रतीक म्हणून माझा वापर करतात.
यापूर्वीही अनेकदा शाहरुखच्या मुस्लिम धर्माशी संबंधित वक्तव्यांमुळे वाद निर्माण झाले आहेत. काही वर्षांपूर्वी प्रेषित महंमद पैगंबर यांच्याबद्दल असांसदीय उद्गार काढल्याबद्दल मुस्लिम संघटनांनी त्याच्याविरोधात पोलीस तक्रार केली होती. मात्र तेव्हा ‘प्रेषित महंमद पैगंबरांचा जन्म ही माझ्यासाठी इतिहासातील एकमेव महत्वाची घटना आहे आणि मी मुस्लिम धर्माच्या भल्यासाठी उभा राहाणं हेच माझ्या आयुष्याचं ध्येय आहे’, असं म्हणत शाहरुखने आपला बचाव केला होता..
First Published: Wednesday, January 23, 2013, 16:39