Last Updated: Tuesday, May 15, 2012, 12:50
www.24taas.com, मुंबई सर्वांच्या लाडक्या ‘धकधक गर्ल’ माधुरीचा दीक्षित-नेनेचा आज वाढदिवस... आज ती ४७ वर्षांची झालीय. आजही अनेक जण माधुरीच्या एका हास्यावर फिदा आहेत. आजही अनेकांच्या हद्याची धकधक वाढविणारी माधुरी ४७ वर्षांची झालीय, यावर कदाचित अनेकांचा विश्वासही बसणार नाही.
१५ मे १९६७ ला एका मराठी परिवारात जन्मलेल्या माधुरीनं डिवाइन चाइल्ड हाईस्कूल मध्ये शालेय आणि मुंबई विद्यापीठातून आपलं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. १९८४ च्या ‘अबोध’पासून तिनं आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. पण तिला खरी ओळख दिली ती १९८८ मध्ये आलेल्या ‘तेजाब’नं. त्यानंतर मग तिला मागे वळून पाहण्याची कधीच गरज भासली नाही. त्यानंतर आलेल्या रामलखन, परिंदा, त्रिदेव, किशन-कन्हैय्या, देवदाससारख्या अनेक चित्रपटांत तिनं आपल्या अभिनयाची जादू दाखवली. बेटा, खलनायक, हम आमके है कौन, दिल तो पागल है, पुकार आणि देवदाससारख्या चित्रपटांनी तर बॉलिवूडमध्ये तिला एक वेगळंच स्थान मिळवून दिलं. आजही ती कित्येक नवख्या कलाकारांची आदर्श आहे. तिच्या उत्तम अभिनयासाठी तिला कित्येक वेळा तीन वेळा सर्वश्रेष्ठ अभिनेत्री म्हणून फिल्मफेअर अवॉर्डही मिळालाय. २००८ मध्ये माधुरी दीक्षितला पद्मश्री पुरस्कारानंही गौरवलं गेलंय.
१९९९ मध्ये माधुरी अमेरिकेत प्रॅक्टिस करत असलेल्या हद्यरोग तज्ज्ञ श्रीराम नेने यांच्याशी विवाहबद्ध झाली. त्यानंतर ती बॉलिवूडपासून थोड्यावेळ दुरावली गेली. पण, आता माधुरी आपले पती श्रीराम आणि आरिन-रिहान या दोन मुलांसह भारतात परतलीय. सध्या ती काही रियालिटी शोमध्ये व्यस्त आहे. पण तिचे चाहते मात्र तिच्या नव्या सिनेमांची मोठ्या आतुरतेनं वाट पाहतायत.
First Published: Tuesday, May 15, 2012, 12:50