'प्रेम' परत येतोय! - Marathi News 24taas.com

'प्रेम' परत येतोय!

www.24taas.com, मुंबई
 
वाँटेड, दबंगसारख्या मारधाडपटातून दिसणाऱ्या फायटर सलमानपेक्षा आपला जुना लाडका कौटुंबिक ‘प्रेम’ पाहाण्यासाठी जे प्रेक्षक आसूसलेले आहेत, त्या चाहत्यांसाठी एक खुषखबर आहे. लवकरच सलमान खान सुरज बढजात्यांच्या आगामी प्रेमकहाणीत दिसणार आहे. 'मैने प्यार किया', 'हम आपके है कौन?' आणि 'हम साथ साथ है' असे तीन कौटुंबिक सुपरहिट सिनेमे सलमानने यापूर्वी राजश्री प्रोडक्शनबरोबर केले होते.
 
बढजात्यांच्या या नव्या सिनेमात सलमान कुटुंबातील बडे भैय्याच्या भूमिकेत असेल. आत्तापर्यंत बढजात्यांच्या सिनेमात सलमान नेहमीच कुटुंबातील शेंडेफळ साकारायचा. पण, पहिल्यांदाच सलमान मोठ्या भावाच्या भूमिकेत असेल.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सलमान आगामी प्रेमकहाणीमध्ये मोठ्या भावाची भूमिका साकारणार आहे. या पद्धतीच्या भूमिका पूर्वी मोहनिश बहल साकारायचा.
 
सलमान खानने आपल्या करीअरमधील काही उत्तम चित्रपट बढजात्यांच्याच राजश्री प्रोडक्शनद्वारेच दिले आहेत. सलमान खानला नायक म्हणून प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनवणारा पहिला चित्रपट 'मैने प्यार किया' हा सिनेमादेखील सुरज बढजात्यानेच दिग्दर्शित केला होता. हम साथ साथ है सिनेमाच्या शुटिंगदरम्यान  काळवीट शिकार प्रकरणी सलमान खान अडकल्यामुळे राजश्री प्रोडक्शन आणि सलमानच्या संबंधांत कटूता निर्माण झाली होती. मात्र, आता आपल्यातील भांडणं मिटवत दोघेही एकत्र आले आहेत, ही प्रेक्षकांच्या दृष्टीने मेजवानीच असेल.

First Published: Thursday, May 24, 2012, 11:56


comments powered by Disqus