Last Updated: Tuesday, June 19, 2012, 10:31
www.24taas.com, मुंबई ‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षितसोबत काम करायला कुणाला आवडणार नाही! हीच इच्छा आहे ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांची... आणि त्यांची ही इच्छा लवकरच पूर्णही होतेय. विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘देढ इश्किया’ या आगामी चित्रपटात लवकरच हे दोघं एकत्र काम करताना दिसणार आहेत.
माधुरी आणि नसिरुद्दीन शाह यांचा एकत्र काम करण्याचा हा पहिला अनुभव नक्कीच नाही. राजीव राय दिग्दर्शित ‘त्रिदेव’, पंकज पराशर दिग्दर्शित ‘राजकुमार’ तसचं एम.एफ.हुसैन यांच्या ‘गजगामिनी’ या चित्रपटांत या दोघाही अभिनय दिग्गजांना एकत्र पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली होती. पण, माधुरीचे एक प्रशंसक असलेल्या नसिरुद्दीन हे मात्र या संधीची जणू काही वाटच पाहत होते. आपण माधुरीसोबत काम करण्यासाठी उत्सुक असल्याचं नसिरुद्दीन शाह सांगतात. ‘मला माहीत नाही माझे चित्रपट माधुरीनं कितपत पाहिलेत, पण मी मात्र तिला एक उत्तम अभिनेत्री मानतो. आणि मी तिच्यासोबत पुन्हा एकदा काम करण्याच्या संधीची वाटच पाहात होतो’, असं नसिरुद्दीन मनमोकळेपणानं सांगतात.
‘देढ इश्किया’ हा 2010 साली प्रदर्शित झालेल्या ‘इश्किया’चा पार्ट – 2 असेल. ‘इश्किया’ या चित्रपटात विद्या बालन, नसिरुद्दीन शाह आणि अर्शद वारसी यांची जुगलबंदी पाहायला मिळाली होती. नव्या चित्रपटात विद्याच्याऐवजी माधुरी दिसणार आहे.
.
First Published: Tuesday, June 19, 2012, 10:31