सलमानची तब्येत बिघडली, नाही करणार अॅक्शन - Marathi News 24taas.com

सलमानची तब्येत बिघडली, नाही करणार अॅक्शन

www.24taas.com, मुंबई
कोट्यवधी तरुणींच्या हृदयावर राज्य करणाऱ्या सलमान खानची तब्येत सध्या बिघडली आहे. तब्येत बिघडल्यामुळे सलमानला मारधाडचे सीन करण्यास मनाई करण्यात आली आहे. सलमानची न्युरोलॉजिकल समस्या पहिल्याच्या तुलनेत अधिक वाढल्याचे बोलले जात आहे.
 
डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार सलमानने अॅक्शन सीन केले तर त्याची तब्येत अधिकच बिघडू शकते, सलमान ट्रायजेमिनल न्युरेलजिया नावाच्या आजाराने त्रस्त आहे. या रोगाने त्रस्त असलेल्या व्यक्तीच्या चेहरा सतत दुखत असतो.
 
या आजारात गाल आणि जबडे ठणकत असतात. यासाठी सलमानने ऑपरेशनही केले आहे. परंतु त्याचं हे दुखणं पूर्णपणे बरे झालेले नाही. आता हे जुने दुखणं पुन्हा परत उमळून आलं आहे. मारधाडच्या दृश्यात सलमानला काही स्टंटही करावे लागतात. तसेच मारधाडच्या दृश्यात चुकून एखादा ठोसा सलमानच्या चेहऱ्यावर बसला तर त्याचा विपरीत परिणाम त्याच्या तब्येतीवर होऊ शकतो, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.
 
या निर्णयामुळे सलमानच्या आगामी चित्रपटांना जबरदस्त धक्का बसण्याची शक्यता आहे. सलमानचे भविष्यात किक आणि शेरखान हे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यात काही जबरदस्त स्टंट असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या चित्रपटाचे निर्माते नव्याने अॅक्शन सीनची आखणी करीत आहेत. दबंगचा सीक्वल म्हणजे दबंग-२ ही एक अक्शन चित्रपट आहे. त्यात सलमान डुप्लिकेटचा वापर करताना दिसणार आहे. परंतु यासाठी मोठ्या प्रयत्नानंतर सलमानने होकार दिला आहे.

First Published: Monday, June 25, 2012, 19:13


comments powered by Disqus