Last Updated: Saturday, June 30, 2012, 14:08
www.24taas.com, मुंबई ड्रीमगर्ल हेमामालिनी आणि धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओल हिचा शुक्रवारी भरत तख्तानी याच्यासोबत विवाह काल संपन्न झाला. या विवाहसोहळ्यासाठी बॉलिवूडसहित अनेक सेलिब्रिटीजनी हजेरी लावली होती. पण या सोहळ्यात इशाचे दोन्ही भाऊ... सनी आणि बॉबी यांची कमतरता अनेकांना जाणवली.
तब्बल चार दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमांसहित हा विवाहसोहळा काल जुहूस्थित इस्कॉन मंदिरात पार पडला. या विवाहासाठी सिनेमा, उद्योग आणि सामाजिक क्षेत्रातले वेगवेगळे दिग्गज आपली उपस्थिती दर्शवित होते. हेमामालिनी आणि धर्मेंद्र यांनी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी काहीही कमी ठेवली नाही. पण धर्मेंद्र आणि त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांची मुलं सनी देओल आणि बॉबी देओल आपल्या बहिणीच्या लग्नाला गैरहजर राहिले. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, सध्या बॉबीचं परदेशात शूट सुरू आहे तसंच सनीही काही पूर्वनियोजित कार्यक्रमांत व्यस्त आहे. त्यामुळे दोघेही या लग्नाला हजर राहू शकले नाहीत.
दोन दिवसांपूर्वी ईशाच्या संगीत सोहळ्यासाठी ईशाचे वडिल धर्मेंद्र हेही उपस्थित नव्हते, अशी चर्चा होती. पण, आपण इथे उपस्थित असून कॅमेऱ्यापासून लांब राहण्यासाठी समोर आलो नव्हतो, अशी प्रतिक्रिया धर्मेंद्र यांनी दिल्यानंतर या चर्चा इथंच थांबल्या. सनी आणि बॉबी दोघेही भाऊ ईशाच्या ग्रॅन्ड रिसेप्शनला उपस्थित राहणार असल्याचं समजतंय.
.
First Published: Saturday, June 30, 2012, 14:08