'रुस्तम-ए-हिंद' दारा सिंग यांचे निधन - Marathi News 24taas.com

'रुस्तम-ए-हिंद' दारा सिंग यांचे निधन

www.24taas.com, मुंबई
 
ज्येष्ठ अभिनेते दारा सिंग यांचं निधन झालंय. ते 83 वर्षांचे होते. दीर्घ आजाराने मुंबईतल्या राहत्या घरी त्यांचं निधन झालंय.  शनिवारी संध्याकाळी अशक्तपणा जाणवत असल्यानं त्यांना कोकिलाबेन धिरुभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.. त्यानंतर रविवारी त्यांच्या प्रकृतीत थोडीफार सुधारणा झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. त्यांच्या लढवय्या वृत्ती प्रमाणेच त्यांनी मृत्यूला गेले पाच दिवस झुंज दिली.. मात्र अखेर आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. रामायणातील हनुमानाची त्यांची भूमिका खूपंच गाजली होती.. या भूमिकेमुळे ते घराघरात पोहोचले होते. त्यानंतरही त्यांनी अनेक मालिका आणि सिनेमात कामं केली. अलिकडच्या 'जब वी मेट' सिनेमातही ते दिसले.
 
दारासिंग यांचा जीवनपट
दारासिंग.. अगदी नावाप्रमाणेच त्यांचा दबदबा.. कुस्तीपटू म्हणून ओळख असलेल्या दारासिंग यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1928 साली अमृतसरच्या धरमोचकमध्ये झाला.. लहानपणापासूनच त्यांना कुस्तीची आवड होती.. आणि तीच आवड जोपासत पुढे एक प्रसिद्ध कुस्तीपटू म्हणून ते नावाजले.. बलदंड शरीरयष्टी असलेल्या दारासिंग यांनी 1962 मध्ये सिल्व्हर स्क्रीनवर तेवढीच दमदार एन्ट्री केली. अनेक दिग्दर्शकांनी त्यांचा खुबीनं वापर करत त्याच्या व्यक्तीमत्वाला साजेशा भूमिका दिल्या. मात्र यामुळं कुस्तीतून प्रेक्षकांचं मनोरंजन करणा-या दारासिंगांनी आपल्या अभिनयातूनही प्रेक्षकांचं तेवढच मनमुराद मनोरंजन केलं.
 
जवळपास 100 हून अधिक सिनेमांमध्ये दारासिंग यांनी काम केलं..मात्र, ख-या अर्थाने दारासिंग घराघरात पोहोचले ते रामायणात साकारलेल्या हनुमानाच्या भूमिकेमुळे.. दारासिंग यांनी ही भूमिका अजरामर केली.. आजही दारासिंग म्हटलं की पटकन डोळ्यासमोर येते ती हनुमानची त्यांनी साकारलेली भूमिका.. त्यानंतरही त्यांनी अनेक मालिकांमध्ये काम केलं.. 1978 साली दारासिंग यांना रुस्तम-ए-हिंद या किताबाने गौरवण्यात आलं.. तर 2003 साली ते राज्यसभेचे खासदारही झाले. कुस्ती आणि अभिनयाप्रमाणेच त्यांनी दिग्दर्शनाच्या क्षेत्रातही स्वत:चं वेगळेपण सिद्ध केलं.. असा हा बॉलिवूडचा अँक्शन किंग यापुढेही कायम स्मरणात राहील..
 

First Published: Thursday, July 12, 2012, 09:32


comments powered by Disqus