Last Updated: Thursday, July 12, 2012, 12:26
www.24taas.com, मुंबई फराह खानचा नवरा शिरीष कुंदर य़ाच्या जोकर या नव्या सिनेमाचा फर्स्ट लूक बुधवारी प्रदर्शित करण्यात आला. खरंतर आज गुरूवारी हा फर्स्ट लूक रिलीज करण्यात येणार होता. मात्र, यूट्युबवर सिनेमातील एका गाण्याच्या लीक होण्याने फराह खानने वैतागून एक दिवस आधीच फर्स्ट लूक लोकांसमोर आणला.
शिरीष कुंदरने दिग्दर्शित केलेल्या जोकर सिनेमात अक्षय कुमार, सोनाक्षी सिन्हा, श्रेयस तळपदे आणि मिनिषा लाबा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा सिनेमा ३-डी फॉरमॅटमध्ये बनवला आहे. सिनेमाची कथा परग्रहवासीयांशी संबंधित आहे. या सिनेमात पहिल्यांदाच सोनाक्षी सिन्हा आयटम नंबर करताना दिसणार आहे. मात्र यातील चित्रांगदा सिंगचं ‘आय वॉंट फक्त यू’ हे आयटम साँग अचानक यूट्युबवर कुणीतरी लीक केलं. त्यामुळे फराह खान आणि शिरीष कुंदर दोघांचाही गोंधळ उडाला आहे.
चित्रांगदा सिंगवर चित्रित केलं गेलेलं 'आय वाँट फक्त यू' हे आयटम साँग जोकर सिनेमाचं वैशिष्ट्य आहे. मात्र या गाण्यातील 'फक्त' या शब्दामुळे सेंसॉर आक्षेप घेण्याची शक्यता आहे. मात्र यू प्रमाणपत्र मिळण्यासाठी हा शब्द बदलावा लागला, असं सांगण्यात येत आहे.
बुधवारी फराह खान आणि शिरीष दोघांनीही लीक झालेल्या व्हिडिओवर नाराजी व्यक्त केली. ट्विटरवर आपला राग व्यक्त करताना फराहा खान म्हणाली, “जोकरचं गाणं यूट्युबवर पागहिलं. अक्षरशः मला हार्ट ऍटॅक यायचाच बाकी आहे. आम्ही आय वाँट फक्त यू गाण्याचे शब्द बदलून आय वाँट जस्ट यू केले आहेत. मात्र यूट्युबवर लीक झालेलं व्हर्जन हे जुन्या गाण्याचं आहे.”
First Published: Thursday, July 12, 2012, 12:26