धकधक गर्ल धडकली मुंबईत.. - Marathi News 24taas.com

धकधक गर्ल धडकली मुंबईत..

झी 24 तास वेब टीम, मुंबई
 
लाखो दिलो की धडकन, म्हणजेच आपली धकधक गर्ल  माधुरी दिक्षीत– नेने ही मुंबईत परतली आहे ते सुद्धा कायमची. माधुरीने संपूर्ण कुटूंबाबरोबर मुंबईत स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आहे.  कॉन्टिनेन्टल फ्लाईट- 48  या विमानानं माधुरी मुंबईतल्या विमानतळावर पोहोचली आणि चाहत्यांनी एकच जल्लोष केला.
 

माधुरी दीक्षित अमेरिकेला बायबाय करुन कायमची मुंबईत परतली आहे. लग्नानंतर बॉलिवूडला रामराम करून माधुरी अमेरिकेत स्थायिक झाली होती. मात्र, माधुरीने आता कायमस्वरुपी मुंबईकर होण्याचा निर्णय घेतला आहे. पती श्रीराम नेने आणि मुलांसह माधुरी नुकतीच मुंबईत परतली आहे. आपल्या मुलांवर भारतीय संस्कार व्हावेत, विशेषतः मराठी संस्कार व्हावेत, म्हणून आपण पुन्हा एकदा भारतात स्थायिक होण्याचा निर्णय घेतल्याचं माधुरीने सांगितलं आहे
 
आता मुंबईत परतल्यानंतर माधुरी पुन्हा जोमाने आपल्या कामालाही सुरुवात करणार आहे हे सुद्धा सांगण्यास ती विसरली नाहीये. मुंबईत आल्याचा आनंद डॉ श्रीराम नेनेंच्याही चेह-यावर स्पष्ट दिसत होता. एकंदरीतच माधुरीच्या या कमबॅकच्या निर्णयाने तिचे कोट्यावधी चाहते खुश झाले आहेत हे मात्र नक्की.

First Published: Saturday, October 8, 2011, 16:31


comments powered by Disqus