Last Updated: Monday, January 30, 2012, 20:44
www.24taas.com, मुंबई प्रजासत्ताक दिनाला प्रदर्शित झालेल्या 'अग्नीपथ'ने पहिल्याच दिवशी २५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. आत्तापर्यंतच्या बॉलिवूडच्या इतिहासात रिलीजच्या दिवशी झालेल्या कमाईतील हा सर्वाधिक कमाईचा आकडा आहे. यापूर्वी गेल्यावर्षी रिलीज झालेल्या ‘बॉडीगार्ड’ने पहिल्या दिवशी २१.६ कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. हृतिकच्या अग्नीपथने बॉडीगार्डचा रेकॉर्ड मोडला आहे.
पहिल्या दिवशीच्या अभूतपूर्व यशाने हृतिक रोशन, प्रियंका चोप्रा हरखून गेले आहेत. या सिनेमातील आपल्या दमदार अभिनयाबद्दल हृतिकने प्रेक्षकांची तसंच समीक्षकांचीही वाहवा मिळवली आहे. हृतिक रोशनने ट्विटरवर आपल्या प्रेक्षकांचे आभार मानताना लिहीलं आहे, “माझ्या सर्व चाहत्यांचे मनःपूर्वक आभार. अग्नीपथने पहिल्याच दिवशी रु. २५ कोटींचा व्यापार केला आहे. तुमच्यामुळे मिळालेल्या यशाने माझा उत्साह द्विगुणित झाला आहे. शुटींगच्यावेळी माझ्या शरीराला झालेल्या जखमा नष्ट होऊन त्यात अचानक नवे प्राण फुंकले गेले आहेत. असं वाटतंय की मी हवेत उडतोय. माझ्या पुढच्या क्रिश-२ सिनेमासाठी माझ्यात नवी ऊर्जा संचारली आहे. ”
अग्नीपथची हिरॉइन प्रियंका चोप्रा ही देखील मिळालेल्या यशाने खूप आनंदी झाली आहे. तिने ट्विट केलं आहे, “माझ्या सर्व फॅन्सचे धन्यवाद. अग्नीपथने पहिल्याच दिवशी २५ कोटींची कमाई केली आहे. जबरदस्त. मला खूप छान वाटतंय. टीम अग्नीपथ यू रॉक !”
करण जोहरची निर्मिती असलेला अग्नीपथ हा ९०च्या दशकातल्या अग्नीपथचा रिमेक आहे. मूळ अग्नीपथमधील अमिताभ बच्चन यांनी साकारलेली विजय दीनानाथ चौहानची व्यक्तिरेखा हृतिक रोशन याने साकारली आहे. मूळ सिनेमातील डॉनी डेग्झाँपाने वठवलेली कांचाची भूमिका नव्या अग्नीपथमध्ये संजय दत्तने सादर केली आहे. मुख्य म्हणजे मूळ अग्नीपथ बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नव्हता. अमिताभ बच्चन यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर अग्नीपथची गणना क्लीसिकमध्ये होऊ लागली होती. मात्र, नव्या अग्नीपथने पहिल्याच दिवशी २५ कोटी रुपयांचा व्यवसाय करत सुपरहिटच्या यादीत जाऊन बसला आहे.
First Published: Monday, January 30, 2012, 20:44