आता 'छम्मक छल्लो' होणार 'बदनाम'! - Marathi News 24taas.com

आता 'छम्मक छल्लो' होणार 'बदनाम'!

www.24taas.com, मुंबई
 
हल्ली आयटम गर्ल्सना चांगले दिवस आल्यामुळे सगळ्याच टॉपच्या नट्या आयटम साँग्सकडे वळल्या आहेत. काही मिनीटांचं आयटम साँग करून सिनेमातल्या मुख्य हिरॉइनपेक्षाही जास्त लोकप्रिय होता येतं, चर्चेत राहाता येतं आणि सगळ्याच इव्हेंटमध्ये परफॉर्म करून भरगोस मानधन मिळवता येतं हे लक्षात आल्यापासून सगळ्याच हिरॉइन्स आयटम साँग्समध्ये आपले जलवे दाखवू लागल्या आहेत. शीला, चमेली नंतर आता बॉलिवूडची 'छम्मक छल्लो' करीना कपूर 'मुन्नी' बनून बदनाम व्हायला तयार झाली आहे. 'दबंग-२'मध्ये मुन्नी बदनामच्या धर्तीवरील आयटम साँगमध्ये करीना ठुमके लगावणार आहे.
 
सलमान-सोनाक्षीच्या 'दबंग-२' ची चर्चा शुटिंग सुरू होण्यापूर्वीच सगळीकडे सुरू झाली आहे. पुढील महिन्यात त्याचं शुटींग सुरू होणार आहे. या सिक्वेलमध्ये 'बदनाम मुन्नी' मलायका आरोरा-खान आयटम नंबर करत नसून तिने करीनाला 'बदनाम' व्हायची संधी दिली आहे. मलायका आरोरा-खान हिला सध्या दिग्दर्शनाचे वेध लागल्यामुळे तिला मुन्नी व्हायला जमणार नाहीये. त्यामुळे तिने ही संधी करीना कपूरला दिली आहे.
 
खरंतर 'दबंग-२' मध्ये मलायका आपली बहिण अमृता आरोराबरोबर सलमान खानसोबत एक हॉट आयटम साँग करणार होती. पण, नंतर हा विचार बदलून ही संधी करीनाला देण्याचं ठरलं. अर्थात या आयटम साँगमध्ये सलमान खान नाचणार आहेच. ‘बॉडीगार्ड’नंतर पुन्हा या गाण्यात करीना आणि सलमानची ब्लॉकबस्टर जोडी पाहाण्याची संधी प्रेक्षकांना मिळेल.
 
'छम्मक छल्लो' गाण्यातील करीनाचं रूप यापूर्वीच तिच्या चाहत्यांना घायाळ करून गेलंय. 'एजंट विनोद'मधील तिचा मुजराही तिचं 'फॅन फॉलोईंग' वाढवतच आहे. आगामी 'हिरॉईन' सिनेमामध्येही 'हलकट जवानी' या तडक भडक आयटम साँगवर करीना आपल्या अदा दाखवणार आहे. आणि त्यात 'दबंग-२'ची भर पडली आहे. बहुतेक मलायका, कतरिनाला मागे टाकत करीना 'आयटम गर्ल'चं बिरूद स्वतःच्या नावावर करून घेणार आहे.

First Published: Tuesday, February 28, 2012, 12:12


comments powered by Disqus