संगीतातील 'रवी'चा अस्त - Marathi News 24taas.com

संगीतातील 'रवी'चा अस्त

www.24taas.com, मुंबई
 
ख्यातनाम संगीत दिग्दर्शक रवी शंकर शर्मा यांचे निधन झालं. हिंदी सिनेसृष्टीत रवी या नावाने ते ओळखले जात. रवी यांचे बुधवारी रात्री त्यांच्या सांताक्रुझ येथील निवासस्थानी निधन झालं ते ८६ वर्षांचे होते.
 
रवी यांच्या पश्चात त्यांचा मुलगा अजय आणि सून वर्षा उसगावकर आहेत. रवी आणि त्यांचा मुलगा आणि सून यांच्यात पराकोटीचे मतभेद निर्माण झाले होते. रवी यांच्या पत्नीचे १९८८ साली निधन झालं. मागच्या वर्षी मालमत्तेच्या वादावरून रवी यांनी वर्षा उसगावकर छळ करत असल्याचा आरोप केला होता. रवी यांनी आपली काही मित्रमंडळी आणि नातेवाईकांसोबत चार दिवसांपूर्वीच आपला ८६ वा वाढदिवस साजरा केला होता.
 
रवी यांचे संगीत हृदयस्पर्शी, मुलायम, नादमय होतं त्यामुळेच त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी आजही तितकीच मनाला भूरळ घालतात. रवी यांचे संगीत अजरामर आहे आणि आज कित्येक दशकांनंतरही ते ताजंतवानं राहिलं असल्याचं त्यांच्या एका जून्या मित्राने ए.कृष्णमूर्ती यांनी म्हटलं आहे. रवी यांनी संगीतबद्ध केलेल्या चौदवी का चाँद, नझराना, हमराझ, वक्त, नीलकमल, गुमराह, दो बदन, औरत, चायना टाऊन, खानदान, घराना, धुँद, आँखे, काजल, एक फूल दो माली, निकाल या सिनेमातील गाणी आजही लोकप्रिय आणि लोकांच्या ओठावर आहेत.
 
चौदवी का चाँद हो, आज मेरे यार की शाही है, निले गगनके तले, बाबुलकी दुआएँ लेती जा, डोली चढाके दुल्हन ससूराल चली, ओ मेरी झोरा जबीँ, तुझे मालुम नहीं ही त्यांची काही गाजलेली गाणी आजही मनाला आनंद देतात. यश चोप्रा आणि बी.आर.चोप्रा यांच्या अनेक सिनेमांना रवी यांनी संगीत दिलं. रवी यांचा जन्म दिल्लीत ३ मार्च १९२६ रोजी झाला. मुंबईच्या फिल्म इंडस्ट्रीत गायक म्हणून नशीब आजमावण्यासाठी ते १९५० साली दाखल झाले.
 
सुरवातीच्या संघर्षाच्या काळात खिशात पैसे नसताना ते मालाड रेल्वे स्टेशन आणि फूटपाथवरही झोपले. काही काळानंतर हुस्नलाल-भगतराम आणि हेमंतकुमार यांच्याकडे त्यांना काम मिळालं. रवी यांचे वडिल भजन गायक होते ते त्यांना महिन्याला ४० रुपये पाठवत आणि काळबादेवी येथे एका चाळीत त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली. रवी यांनी दिवसाला दीड रुपयांवर गुजराण करत संघर्ष चालूच ठेवला. अखेरीस गुरुदत्त यांनी रवी यांना चौदवी का चाँद या सिनेमाच्या संगीत दिग्दर्शनाची पहिली संधी दिली आणि त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

First Published: Thursday, March 8, 2012, 12:41


comments powered by Disqus